Latest

उम्मीद पर दुनिया कायम है!

अमृता चौगुले

पुढील काळात 'पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि शिक्षण' या त्रिसूत्रीवर काम केले तर आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ आणि नव्या उमेदीने पुढील वाटचाल देखील करू. 2022 या वर्षाचा विचार करता हे जग 'उम्मीद' या एकाच गोष्टीवर टिकून राहील असे वाटते…

'उम्मीद पर दुनिया कायम हैं, कहते हैं सभी..!' 2022 च्या सुरुवातीला या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे मागील दोन वर्षांतील आपण घेतलेले भयावह अनुभव. दोन वर्षांत आपण सर्व जागतिक महामारीचा सामना करतो आहोत. अनेकांनी आपले आप्त, मित्र मागील कोरोनाच्या कारणाने गमावले आहेत. त्यामुळे 2022 या वर्षाचे वर्णन 'उम्मीद' या एकाच शब्दात करावे लागणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जात आहोत. कोरोनाचा काळ मागे पडतो आहे आणि आपण सर्व पुन्हा सुरुवात करतो आहोत, असे वाटत असतानाच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने आपली जगावरची पकड आवळली आहे. अजून किती लाटा येतील हे आल्याला माहिती नाही. पण, पहिल्या दोन लाटेप्रमाणे आपण पुन्हा या तिसर्‍या लाटेशी झुंज देऊ हे नक्‍की. ही लढाई सुरू करण्याअगोदर आपण मागील दोन लाटेतून शिक्षण घेतले पाहिजे आणि पुढील तीन गोष्टी प्रामुख्याने सुरू करायला पाहिजेत.

येणारे वर्ष आपल्याला आरोग्यदायी आणि आनंदी जावे असे वाटत असेल तर '3ए' हा मंत्र असायला हवा. म्हणजेच 'एन्व्हायर्न्मेंट, इकॉनॉमी आणि एज्युकेशन'. नोव्हेंबर 2021 मध्ये उजझ 2021 ही परिषद आंतरराष्ट्रीय स्तरावर पार पडली. एका बाजूला कोरोनाचे संकट जगभर थैमान मांडत असतानाच पर्यावरणातील बदलांनी आपल्या राज्याला, देशाला आणि जगाला मोठे तडाखे दिले. ज्या भागात कधी पाऊस झाला नाही, त्या भागात अवकाळी पाऊस पडला. अरबी समुद्रात असंख्य वादळे या मागील दोन वर्षांत पहिल्यांदाच निर्माण झाली. परिणामी क्लायमेट चेंज हे सर्वांनी स्वीकारायला चालू केले आहे. आपल्या गल्लीपासून न्यूयॉर्कशहरापर्यंत पर्यावरण बदलाचे वारे वाहू लागले आहे. अशा एखाद्या परिषदेमध्ये पर्यावरण बदलाची चर्चा होऊन काहीही होणार नाही. सामान्य लोकांच्या छोट्या छोट्या बदलातून पर्यावरणाच्या प्रश्‍नाला सामोरे गेले पाहिजे. संपूर्ण जग आता कार्बन न्यूट्रल होण्याचे स्वप्न पाहतो आहे. महाराष्ट्र सरकारने आणलेले ई-व्हेईकल धोरण हा त्याचाच एक भाग म्हणून पाहता येते. देशात देखील कार्बन इमिशन कमी करण्यासाठी केंद्र पातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले जात आहेत. पर्यावरणाचे संकट आपल्या समोरील सर्वात मोठे संकट म्हणून उभे आहे. सध्या हे संकट सायलेंट आहे. पण मानवाला कधी ना कधी पर्यावरणाच्या समस्यांना प्राथमिकता द्यावीच लागणार आहे. व्यक्‍ती, संस्था, राज्य पातळीवर पर्यावरण बदलाला महत्त्व देऊन छोटे छोटे बदल करण्यास सुरुवात करावी लागेल. त्यातूनच एक मोठा परिणाम आपल्याला पुढे दिसू शकेल. पर्यावरणात केलेली सुधारणा पुढील अनेक पिढ्यांना फायद्याची ठरेल.

दुसरी गोष्ट आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेची. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असंघटित क्षेत्रातील लोकांचे रोजगार जात होते. अजूनही प्रि-कोव्हिड पातळीवर रोजगार आणि उद्योग क्षेत्र आलेले नाही, असे एमसीसीआयसारख्या संस्था सांगतात. मात्र दुसर्‍या बाजूला भारतासह जगभरात द ग्रेट रेझिग्‍नेशनसारख्या घडामोडी घडत होत्या. नॉलेज इकॉनॉमी म्हणजे आयटी आणि तत्सम क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना खूप चांगल्या संधी या कोरोना काळात उपलब्ध झाल्या. अनेकांचे पगार दुपटीहून अधिक झालेत. या सर्वांतून समाजातील आर्थिक असमानता वाढू नये आणि सामाजिक स्थैर्य टिकून राहावे यासाठी काम करण्याची गरज आहे. या काळात अनेकांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम करिअर बनवले. त्यांचे कौतुक आपण केले पाहिजेच. पण, सोबतच या संधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा मिळतील हे पाहणे देखील गरजेचे आहे. जॉबलेस ग्रोथ न होता अनेकांच्या हाताला रोजगार मिळत देशाची अर्थ प्रगती उंचावत राहिली पाहिजे. इंडस्ट्री 4.0 ने आता वेग पकडला आहे. ही नवीन पण क्रांतिकारी इंडस्ट्री वेगाने आपले पाऊल सर्वच क्षेत्रांत पसरत आहे. यातून काही संधी नक्‍कीच निर्माण होतील. पण, अनेकांची कामे आता यंत्र मानवच करतील, अशी भीती आहे. यंत्रांमुळे अनेक कामे सोपी झाली. मागील दोन वर्षांत यंत्रे देखील बदलत आहेत. हे बदल आपणही स्वीकारतो आहे. पण यातून बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची दक्षता देखील घ्यावी लागणार आहे. रोजगाराशिवाय अर्थव्यवस्था वाढत राहीलही. पण त्याचे होणारे सामाजिक आणि राजकीय परिणाम भयावह असतात. महाराष्ट्राचा विचार करता आर्थिक प्रगती केवळ काही जिल्ह्यापुरती न राहता संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती कशी होईल यावर विचार आणि धोरण निर्माण करायला हवे. टीअर 2 आणि टीअर 3 शहरांतून नवे उद्योजक तयार होतील, याचा विचार प्रामुख्याने करायला हवा. गेल्या वर्षी भारतात 44 युनिकोर्न उभे राहिले. येणार्‍या वर्षात त्यांची संख्या वाढली पाहिजे. पण केवळ ठरावीकच जिल्ह्यातून युनिकोर्न उभे न होता देशातील छोट्या जिल्ह्यांतून उद्योजक आणि युनिकोर्न उभे राहायला हवेत. शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करणे आता पुढील लक्ष्य असावे लागणार आहे. चांगली आर्थिक प्रगती ही समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची असते.

तिसरा मुद्दा आहे तो शिक्षणाचा. गेल्या दोन वर्षांत सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचे नुकसान झाले असेल तर ते शिक्षणाचे झाले आहे. कोरोना काळात अनेकांना शिक्षणापासून लांब राहावे लागले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला. कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल झालेच नाहीत. तेव्हा एक मोठा वर्ग चांगल्या शिक्षणापासून वंचित राहिला आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून नव्या जगाची नवी कौशल्ये द्यावी लागतील. व्हर्च्युअल शिक्षणामुळे विशेष ट्रेनिंगची गरज निर्माण झाली आहे. अशा अनेक प्रश्‍नांना भिडणे ही आपल्या पुढची मोठी लढाई आहे. भारत हा तरुण देश आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभार्थी आहे. या संधीचे सोने करायचे असेल तर त्याला लागणारे इंधन म्हणजे फक्‍त आणि फक्‍त शिक्षण हेच आहे. एका बाजूला बदलणारा काळ आणि बदलणारे तंत्रज्ञान आपला प्रभाव वाढवत आहे; तर दुसर्‍या बाजूला केवळ स्क्रीनमधून झालेले व्हर्च्युअल शिक्षण अशा प्रचंड मोठ्या दुहीत आजचा तरुण वर्ग आणि लहान मुले देखील सापडलेली आहेत. त्यामुळे धोरणाच्या पातळीवर पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रात प्रयत्न करणे, इनोव्हेटिव्ह मुद्दे चर्चेस घेणे आणि आपल्या शिक्षकांना अपडेट करणे गरजेचे आहे. आपण आता व्हर्च्युअल शिक्षणाची सवय लावली आहे. जगभरातील उत्तम शिक्षकांकडून उत्तम शिक्षण घेण्यासाठी त्याचा नक्‍कीच फायदा होईल. सोबतच जगभरातील नवी कौशल्ये आपल्याला आत्मसात करता येतील. त्यामुळे पुढील काळात पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर काम केले तर आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊ आणि नव्या उमेदीने पुढील वाटचाल देखील करू. 2022 या वर्षाचा विचार करता हे जग 'उम्मीद' या एकाच गोष्टीवर टिकून राहील असे वाटते…

  • डॉ. योगेश प्र. जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT