गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करावा या एकमुखी मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने २१ दिवस चौंडी येथे अमरण उपोषण करण्यात आले होते. या दरम्यान राज्य शासनाने धनगर समाज आरक्षणासाठी दिलेला ५० दिवसांचा अल्टिमेटम उद्या संपत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी, दि.१५) रोजी उपोषणकर्ते सुरेश बंडगर तसेच सकल धनगर समाज दुपारी १ वाजता गंगाखेड येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा उपोषणाचा एल्गार पुकारत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. राज्यभरातील धनगर समाजबांधवांचे लक्ष आता गंगाखेडकडे लागले आहे.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे २१ दिवसांचं (दि.६ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर) आमरण उपोषण करण्यात आलं. यशवंत सेनेचे प्रदेश सरचिटणीस उपोषणकर्ते सुरेश बंडगर (गंगाखेड) व प्रदेश उपाध्यक्ष अन्नासाहेब रुपनर (माळसिरस) यांच्या प्राणांतिक उपोषणाने सरकारला चौंडीत चर्चेला येण्यासाठी भाग पाडले. राज्य शासनाच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपोषणस्थळी आले. उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून दिला. राज्य शासनाच्या वतीने यशवंत सेनेचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले तसेच उपोषणकर्ते सुरेश बंडगर व अन्नासाहेब रुपनर यांना ५० दिवसांची मुदत मागून धनगर समाजाचा प्रश्न सकारात्मक मार्गी लावू असे ठोस आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते.
राज्य सरकारने दिलेला ५० दिवसांचा 'अल्टीमेटम' उद्या बुधवारी संपत आहे. दरम्यानच्या काळात राज्य शासन धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यात सपशेल अपयशी ठरले. परिणामी उपोषणकर्ते सुरेश बंडगर समाजबांधवांसह पुन्हा उपोषणाचा एल्गार पुकारुन सरकारशी दोन हात करण्याचा इरादा जाहीर केला आहे. उद्या बुधवारी (दि.१५) रोजी सुरेश बंडगर हे पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा करणार आहेत. एकंदरीत धनगर समाजाला राज्य शासनाने ठोस आश्वासन देऊनही कुठलीच भूमिका न घेतल्याने आता धनगर समाज बांधवांच्या वतीने सुरेश बंडगर उद्या काय भूमिका मांडतात याकडे राज्याच्या राजकीय क्षेत्रासह धनगर समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला जेरीला आणले असतानाच आता धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार आहे. सुरेश बंडगर पुन्हा चौंडी येथे उपोषण करणार असल्याने राज्यातील धनगर समाजाच्या रोषाला राज्य शासन कसे सामोरे जाते याकडे मराठा व धनगर समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.