नांदेड : प्रमोद चौधरी
मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या येथील केंद्राकडून तयार करण्यात आलेला राष्ट्रध्वज सोळा राज्यांत पाठविला जातो. या ध्वजासाठी लागणारे कापड उदगीर येथे तयार होते. नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही डौलाने फडकतो, हे विशेष!
नांदेडमध्ये विविध आकारांतील राष्ट्रध्वज तयार केले जातात. सर्वात मोठा 14 बाय 21 फूट आकाराचा असतो. अन्य ध्वज 8 बाय 21 फूट, सहा बाय नऊ फूट, चार बाय नऊ फूट, तीन बाय साडेचार फूट, दोन बाय तीन फूट तसेच साडेसहा इंच बाय नऊ इंच आकाराचे बनविले जातात. मंत्रालयावर दररोज फडकणारा, मंत्र्यांच्या कारवर फडकणारा व राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयांवर फडकणारा राष्ट्रध्वज हा खादी ग्रामोद्योग समितीत तयार केला जातो. यातून खादी समितीला दरवर्षी आठ ते नऊ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. उदगीर येथे संस्थेची दोन एकर जागा असून, या ठिकाणी ध्वजासाठी लागणारा धागा आणून कापडाची निर्मिती केली जाते.
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील केंद्रात ध्वजाचे कापड आणून नांदेडमध्ये ध्वजाची निर्मिती केली जाते. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, एक मे, 17 सप्टेंबर या महत्त्वाच्या दिवसांसाठी तिरंगा ध्वजनिर्मितीचे काम वर्षभर सुरू असते. साधारणपणे एक कोटी ध्वज तयार होतात.- ईश्वरराव भोसीकर, अध्यक्ष, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती