शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : शेळगाव (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. ६) मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी ५ ठिकाणी घरफोडी करून धुडगूस घातला. यामधे ६ लाखाहून अधिक रकमेचे दागदागिने तसेच रोख रक्कम लंपास केली आहे. दरम्यान चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्याना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दोन महिला व १ पुरुषाला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेळगाव येथील घुमटमळा येथे चोरट्याने मारुती रामचंद्र लकडे यांच्या घराचा पाठीमागून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
यावेळी मारुती लकडे यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दांडके व काठ्याच्या साहाय्याने मारुती रामचंद्र लकडे (वय ६०) तसेच त्याची पत्नी सिमा मारुती लकडे (वय ५५) व छबाबाई सुभाष नाळे (वय ६५) यांना जबर मारहाण केली. यामध्ये तिघांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून ते बारामती येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. चोरट्यानी मारुती लकडे यांच्या घरातील ४० हजार रोख रक्कमेसह ११ तोळे सोन्याचे दागिने मिळून ६ लाखाहून अधिक रक्कम व ऐवज लंपास केला. शिवाय चोरट्याने शेळगाव गावठाणातील तसेच परिसरातील परशुराम मोहिते, मिलिंद जाधव, अशोक जाधव व बाळु जाधव यांच्याकडे घरफोडी केली. परंतु त्यांना काहीही मिळून आले नाही.
घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोइटे, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती गणेश इंगळे, गुन्हे अनवेषन विभागाचे अमित शीद पाटील तसेच वालचंदनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुखे यांनी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी श्वानपथक सह अन्य तपास यंत्रणा दाखल झाली आहे.