file photo 
Latest

मोबाईल पहाताना रागावल्याच्या कारणातून मुलाने आईचा गळा दाबून केला खून

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभ्यास करताना मोबाईल पहात असलेल्या मुलाला रागवल्याच्या कारणातून १२ वीत शिकणार्‍या एका मुलाने आईला भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर तीचा गळा दाबून खून केला. हा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन परिसरात घडला आहे. तस्लीम जमीर शेख (वय ३७, रा. उरुळीकांचन) असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी संशयित आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अमोल लक्ष्मणराव घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उरुळी कांचन येथील माऊली कृपा इमारतीत १५ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. डॉक्टरांना संशय आल्याने तेथे तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गळा दाबून आणि डोक्याला जखम झाल्याने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा नेमकी कोण माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे सुरुवातील पोलिसांनी अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला़. ही घटना घडली, तेव्हा वडिल जमीर आणि मुलगा जिशान हे दोघेच तेथे होते. त्यांच्याकडे स्वतंत्र चौकशी केल्यावर मुलाने घडलेली घटना सांगितली.

जमीर शेख हे नमाज पठणासाठी गेले होते. त्यांची धाकटी मुलगी बाहेर गेली होती. मुलगा हा बारावीला आहे. तो अभ्यास करीत असताना मोबाईलवर पहात बसला होता. ते पाहून त्याची आई तस्लीम चिडली आणि त्याच्यावर रागवली. त्याच्या गालावर चापट मारली. त्यामुळे मुलाने आपल्या आईला जोरात भिंतीवर ढकलुन तिचा गळा दाबला. त्यात तिचा मृत्यु झाला.

आई निपचित पडल्याचे पाहून तो घाबरला. त्याने ब्लेडने तिचे मनगट कापले. परंतु, मृत्यु झाला असल्याने त्यातून रक्त आले नाही. त्याने वायर फॅनला अडकविली. खाली आईचा मृतदेह ठेवला. काही वेळाने जमीर शेख आल्यावर आईने गळफास घेतला. मी तिला खाली उतरुन ठेवल्याचे सांगितले. त्यांनी तस्लीम यांना जवळच्या रुग्णालयात नेले.

तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. शवविच्छेदनात खूनाचा प्रकार समोर आला. याबाबत घरातील कोणीही फिर्याद देण्यास तयार नसल्याने पोलिसांच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक काळे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT