नाशिक : पुढारी वृत्तसेवा, आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेने(शिंदे गटा)ने पक्षसंघटना बांधणीत आघाडी घेतली असून, नवरात्रौत्सवात शहरातील ३१ प्रभागातील १२२ शाखाप्रमुखांची नियुक्ती घोषित केली जाणार आहे. 'सेवा, सुरक्षा व संस्कृती' हे ब्रीद घेऊन प्रत्येक शाखेवर शिवसेनेचा लक्षवेधी फलक उभारला जाणार आहे. त्यावर शाखाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक नमूद केले जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.
संबधित बातम्या :
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेवरच दावा करत भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. नाशिकमध्ये सुरूवातीला ठाकरे गट एकसंध होता. परंतू बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाला खिंडार पडले. त्यानंतर ठाकरे गटाचा एक-एक मोहरा शिंदे गटाच्या गळाला लागत गेला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाशिक दौऱ्याच्या वेळी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेशकर्त्यांची अक्षरश: रांग लागत गेली. अखेर शिंदे गटालाच हे प्रवेशसत्र थांबवावे लागले. यानंतर जिल्हाप्रमुख बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने राबविलेले लोकाभिमुख उपक्रम लक्षवेधी ठरले. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने पक्ष संघटना बांधणीला सुरूवात केली आहे.
विभागप्रमुख, उपविभागप्रमुखांची नियुक्ती घोषित केल्यानंतर आता ३१ प्रभागांमधील १२२ शाखाप्रमुखांची नियुक्ती घोषित केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी पालक पदाधिकारीही निवडला जाणार आहे. शाखाप्रमुखांचे कामकाज, त्यांची वर्तवणूकीचा लेखाजोखा पालक पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाईल. त्यातून शाखाप्रमुखांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
शाखाप्रमुखांचा दिवाळीनंतर मेळावा
पालक पदाधिकारी व शाखाप्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पक्षसंघटना बांधणीकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी दिवाळीनंतर खा. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शाखाप्रमुखांचा मेळावा घेतला जाणार आहे.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे तत्व आहे. शिवसेनेचा प्रत्येक शाखाप्रमुख नागरिकांना आपला रक्षक वाटावा यासाठी घटस्थापनेनंतर सेवा, सुरक्षा व संस्कृती हे ब्रीदवाक्य घेऊन १२२ शाखाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार असून त्यांच्यामार्फत जनसेवेचे कार्य उभारले जाणार आहे.
– अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना(शिंदे गट)
हेही वाचा :