मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर धावपळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. ज्येष्ठ नेत्यांच्या सहमतीनुसार शिव- सेना २२, काँग्रेस १४ आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये ऐनवेळी समविचारी पक्ष सहभागी होण्याची शक्यता गृहीत धरून तूर्तास ४ जागा मोकळ्या ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, जागावाटपाच्या पहिल्या चर्चेतून वंचित बहुजन आघाडीला वगळले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसताना भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या तुलनेने महाविकास आघाडीच्या निव्वळ चर्चेच्या फेऱ्याच सुरु असल्याची खंत मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. लोकसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्याच पक्षाला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित किंवा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शिवसेनेकडून विचार होण्याची शक्यता आहे. राज्यात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा प्रभाव नसला तरी या पक्षाच्या व्होट बँकेचा आघाडीतील नेत्यांनी विचार केला आहे.. त्यामुळे एखाद- दुसरी जागा चर्चेअंती बदलू शकते.