Latest

समाजभान : जबाबदारीचा यक्षप्रश्न

Arun Patil

अलीकडील काळात विवाहित कुटुंबांमध्ये पतीच्या आई-वडिलांना म्हणजेच सासू-सासर्‍यांना न सांभाळण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याबाबत अनेक मतमतांतरेही दिसून येतात. परंतु मुलाने हात सोडलेल्या वयोवृद्ध माता-पित्यांनी जायचे कुठे याचा विचार सर्वाधिक महत्त्वाचा आहे. अलीकडेच कोलकाता उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यानुसार कोणत्याही पतीला आपल्या पालकांपासून दूर राहण्यास भाग पाडणार्‍या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

कोणत्याही पतीला आपल्या पालकांपासून दूर राहण्यास भाग पाडणार्‍या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. 2016 मध्ये नरेंद्र वि. मीनाच्या संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले होते की, हिंदू समाजात आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे इतिकर्तव्य आहे. समाजातील रूढी-परंपरा आणि प्रथांविरोधात जाऊन आपल्या पतीच्या उत्पन्नावर तिच्या एकटीचाच अनन्य अधिकार आहे असे सांगत, कोणत्याही न्याय कारणाशिवाय पतीला वेगळे राहण्यास भाग पाडत असेल तर ते मान्य होणार नाही.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला कट्टर स्त्रीवादी समर्थकांनी पितृसत्ताक व्यवस्थेचे पालनपोषण करणारा म्हणून संबोधले होते. कारण स्त्रीचे लग्न केवळ पुरुषाशी होते आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाशी नाही, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे पत्नीला पतीसोबत एकटे राहण्याचा अधिकार आहे असे या गटाचे म्हणणे असते. तीव्र व्यक्तिवादी विचारसरणीवर आधारित ही मानसिकता वृद्ध पालकांना ओझे म्हणून पाहते. पाश्चिमात्य संस्कृतीचा बुरखा पांघरलेले तथाकथित आधुनिक परंपरेचे पुरस्कर्ते एकल कुटुंबाच्या बाजूने आहेत. प्रत्यक्षात आज हेच पाश्चात्त्य देश विखुरलेली कुटुंबे आणि वडीलधार्‍यांना एकटेपणाशी झुंजताना पाहून व्यथित होत आहेत. पालकांची आज्ञा न मानणार्‍या, त्यांची अवहेलना करणार्‍या मुलांना शिक्षा होऊ शकेल अशा प्रणालीची स्थापना करण्याचा ते अधिकाधिक प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेच्या 30 राज्यांमध्ये फिलियल रिस्पॉन्सिबलिटी (ड्युटी ऑफ केअर) हे विधेयक संमत करण्यात आले आहे. डेव्हिस विरुद्ध कॉमनवेल्थ ऑफ व्हर्जिनियामध्ये, व्हर्जिनियाच्या सर्वोच्च न्यायालयाने मेरी डेव्हिसला तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून तिच्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मेरीने तिच्या बचावात असा युक्तिवाद केला की, तिच्या आईची काळजी घेणे हे तिचे मूलभूत कर्तव्य नाही. भारतातही विवाहित मुलींनी त्यांच्या पालकांची काळजी घेणे बंधनकारक आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. 18 फेब्रुवारी 1987 रोजी 'विजया मनोहर अरबत विरुद्ध काशीराव राजाराम सवाई आणि इतर' या खटल्यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी उल्लेखनीय आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित मुलीला तिच्या पालकांना सांभाळण्याचे बंधन नाही हा युक्तिवाद आम्ही स्वीकारण्यास असमर्थ आहोत. ही विकृती नाही तर आणखी काय आहे? एकीकडे विवाहित मुली आई-वडिलांची काळजी घेणे हे आमचे नसून त्या त्या मुलांचे कर्तव्य आहे असे मानतात; तर दुसरीकडे मुलांच्या बायका सासू-सासर्‍यांची काळजी घेणे हा त्यांच्या जबाबदारीच्या क्षेत्राचा भाग नाही असे म्हणतात. मग वृद्ध आई-वडिलांनी जायचे कुठे? या यक्षप्रश्नाच्या उत्तरात भारत, चीन, सिंगापूर, इस्रायलपासून ते अमेरिकेपर्यंत पालकांच्या पालनपोषण आणि कल्याणाशी संबंधित कायदे करण्यात आले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये, सिंगापूर संसदेचे सदस्य, वॉल्टर वून यांनी टीकाकारांना उत्तर देताना असे म्हटले की, पॅरेंटल केअर कायदा आई-वडिलांवरील प्रेमाला प्रोत्साहन देणार नाही. वून म्हणाले, जिथे नैतिकतेने काम होत नाही, तिथे कायदा संरक्षण देण्याची भूमिका पार पाडतो.

प्रश्न केवळ वृद्ध आई-वडिलांच्या आर्थिक गरजांचा नाही. त्याहून गंभीर समस्या म्हणजे त्यांच्यात वाढत जाणारा एकटेपणा ही आहे. हा एकटेपणा अपराधीपणाच्या भावनेला आणि नैराश्याला देखील जन्म देतो. ब्रिस्टलच्या वेस्ट इंग्लंड विद्यापीठातील मानसशास्त्राच्या व्याख्यात्या लुसी ब्लेक म्हणतात की, जेव्हा मुलांचे त्यांच्या पालकांशी खेळीमेळीचे संबंध नसतात तेव्हा पालकांच्या मनात अपयशाची भावना येते आणि त्यामुळे त्यांना त्रास होतो. त्याचवेळी पालक म्हणून आपण आपली भूमिका आणि जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत, अशा अपराधीपणाची भावना वाढीस लागण्यास मदत होते.

अडोलसेंट्र-टू-पेरेंट अ‍ॅब्यूज : करंट अंडरस्टँडिंग्ज इन रिसर्च पॉलिसी अँड प्रॅक्टिसच्या लेखिका अमांडा हॉल्ट म्हणतात की, या सर्वांमध्ये अधिक वेदनादायक बाब पालकांकडे सर्व शक्ती असते; पण मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्या शक्ती मुलांच्या हातात जातात. या सत्याकडे किंवा वास्तवाकडे डोळेझाक करता येणार नाही. आज आपल्या आई-वडिलांना आपण जी कठोर वागणूक देतो आहोत, तीच उद्या चालून आपल्या वाट्यालाही येऊ शकते, याचे भान ठेवले नाही किंवा त्याचा विचार केला नाही तर ती सर्वांत मोठी चूक ठरेल यात शंका नाही.

डॉ. ऋतू सारस्वत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT