India-Bharat :  
Latest

सत्ताधारी-विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज ठप्प

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे गेल्या आठवड्याभरापासून संसदेचे कामकाज ठप्प पडले आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीच्या स्थितीवर लंडनमध्ये केलेले वक्तव्यावर सत्ताधारी आणि अडाणीच्या मुद्दयावर विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाज खोळंबले आहे. सोमवारी, १३ मार्चपासून १७ मार्च दरम्यान कुठलेही चर्चा होवू शकली नाही. विरोधकांची एकी आणि सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेमुळे सभागृहाच्या कामकाजात झालेली कोंडी पुढील आठवड्यात तरी फुटेल का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शुक्रवारी (दि.१७) रोजी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी-विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. लोकसभेची कारवाई सुरू होताच संसद टीव्हीवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. पंरतु, सुरूवातीच्या १८ ते १९ मिनिटांपर्यंत कामकाजाचा आवाज बंद करण्यात आला होता. थेट प्रक्षेपणाचा आवाज सुरू होताच सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकुब करण्यात आले. राज्यसभेत देखील हीच स्थिती बघायला मिळाली. वरिष्ठ सभागृहात विरोधक आक्रमक दिसून आले. राहुल यांनी माफी मागावी, या मुद्दयावर पहिल्या दिवसापासून भाजप आक्रमक झाली आहे. तर, 'सभागृहात बोलू दिले नाही तर बाहेर बोलू' अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली.

दरम्यान, लोकसभेचे कामकाज सुरू होताच गदारोळ सुरू झाला. कनिष्ठ सभागृहातील गोंधळामुळे थेट प्रक्षेपणाचा आवाज बंद करण्यात आला. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी आवाज पुन्हा सुरू करण्यात आल्यावर 'हाउस ऑर्डर' मध्ये राहिल्यावर सर्वांना बोलण्याची संधी मिळेल, असे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना सुनावले. पंरतु, गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकुब करण्यात आले. तर, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विविध विषयांवर चर्चेसाठी देण्यात आलेल्या नोटीस फेटाळल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढताच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

माय लॉर्ड

राज्यसभेचे सभापतींनी सदस्य, जेष्ठ वकील महेश जेठमलानी यांचे नाव पुकारताच ते 'माय लार्ड' म्हणाले त्यामुळे तणावाच्या वातावरणात सभागृहामध्ये एकच हशा पिकला. न्यायालयाच्या कारवाईमध्ये न्यायाधीशांना उद्देशून हा शब्द बोलला जातो. जेठमलानी न्यायालयाच्या कारवाईत सहभागी होतात. अशात ते राज्यसभेत चुकून 'माय लॉर्ड' बोलले. नकळत झालेल्या या चुकीमुळे त्यांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले.

विरोधकांचे आंदोलन

सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब होताच विरोधकांनी संसदेच्या आवारात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. सोनिया, राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अधिरंजन चौधरी यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते या आंदोलनात उपस्थित होते. जवळपास १६ हून अधिक विरोधी पक्षांनी या आंदोलनात भाग घेतला. अडाणी मुद्दयावर संयुक्त संसदीय समितीची जेपीसी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राहुल गांधी यांनी कुठलेही चुकीचे वक्तव्य केले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका कॉंग्रेसची आहे.

राहुल गांधी कधीकधी खरं बोलतात

राहुल गांधी कधीकधी खरं बोलतात. दुदैवाने मी खासदार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. खऱ्या अर्थाने ते दुदैवानेच खासदार आहेत. सदस्य असतानाही ते सभागृहाची प्रतिमा मलीन करीत आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लगावला. सभागृहात असते तर काही तरी करू शकले असते. पंरतु, सभागृहाचे कामकाज प्रक्रिया धोरणाने चालते हे त्यांना माहिती नाही. नियमांची माहिती पुस्तिका त्यांना देण्यासाठी घेवून आलो होतो. पंरतु, ते वाचत नाहीत. कामकाजात ते खुप कमी सहभागी होतात. सातत्याने खोटं बोलण त्यांची सवय बनली आहे. अशात त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT