Latest

पुणे : लोकशाही बळकट करण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा ः चंद्रकांत पाटील

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा, असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थितांना संबोधित करत होते.  पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्याय, बंधुता आणि सर्वांना समान मूल्य देणारी समता दिली. अनेक देशांना मताचा अधिकार मिळण्यासाठी विशेषतः गरीब, महिलांना संघर्ष करावा लागला. भारतीय राज्यघटनेने मात्र पहिल्या दिवसापासूनच सर्वांना समान मताचा अधिकार दिला. त्यातून सर्वसामान्य माणूस त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर उच्च पदावर पोहोचू शकतो. नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्य पालनाबाबत सजगता दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.

पद्मभूषण पूरस्कार जाहीर झालेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक धर यांच्यासह राज्यातील पद्म पुरस्कार विजेते, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचे पाटील यांनी अभिनंदन केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना मतदार नोंदनीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल भारत निवडणूक आयोगाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

पोलीस दलाने संचलन करून राष्ट्रध्वजास  मानवंदना दिली. यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, पुणे शहर पोलीस दलाचे पुरुष पोलीस, महिला पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस, लोहमार्ग पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, वन, अग्निशामक दल तसेच इमॅन्युएल मार्थोमा स्कूल, भारती विद्याभवन स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी शिस्तबद्ध संचलन केले. तसेच पोलीस वाद्यवृंद, श्वानपथक, वज्र वाहन, जलद प्रतिसाद दल वाहन, वरुण वाहन, अग्निशामक वाहन, रुग्णवाहिका, बालभारतीचा चित्ररथ, महानगरपालिकेची स्वच्छ्ता वाहने यांनीही संचलनात सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले.

पालकमंत्री चंद्रकांतपाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलीस परेड मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे  महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिचंवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुधाकर काटे आणि पुणे शहराचे सहायक पोलीस उपनिरीक्षक धनंजय बारभाई तसेच केंद्रीय गृहमंत्री पदक प्राप्त पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर पालकमंत्री पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT