Latest

कोठडीतील मोबाईलसाठी पोलिसांनी कमोड तोडले

अमृता चौगुले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  कोठडीतून कैद्याने फोनवरून खंडणी मागितल्याचे वृत्त 'पुढारी'त प्रकाशित होताच पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. डीवायएसपी सोमनाथ वाीकचौरे यांनी स्वत: कोठडीची तपासणी केली. मात्र काही सापडले नाही. अखेर पोलिसांनी कोठडीतील कमोड तोडले, मात्र तरीही मोबाईल आढळून आला नाही. कोठडीतून फोन केला हे खरे असले तरी तो मोबाईल लंपास करत कैद्यांनी चुप्पी साधल्याने तपासाचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

पोखरी बाळेश्वर शिवारातील वेश्याव्यवसायाच्या प्रकरणात पोलीस कोठडीतील एका आरोपीच्या नातेवाईकाकडे बुधवारी कोठडीतून कैद्याने मोबाईलवर संपर्क साधत खंडणी मागितल्याचे समोर आले. त्याचे वृत्त 'पुढारी'त प्रसिद्ध होताच संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चारही कोठड्यांची संपूर्ण झाडाझडती घेतली. टॉयलेटचे कमोडही तोडले मात्र मोबाईल सापडला नाही. कोठडीत राहूनही पोलिसांना गुन्हेगार भारी पडल्याची चर्चा सुरू आहे.

नव्याने आलेल्या कैद्यांचा छळ करणे, खंडणीसाठी संपर्क साधण्यासाठी मोबाईल वापरणार्‍या कैद्याची दहशत अगदी पोलिसांनाही असल्याची कुजबूज सुरू आहे. आता खरे काय नी खोटे काय? हे गुलदस्त्यात आहे. यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

गांर्भीय मोठे, केवळ कैद्यांची जागाबदल!
संगमनेर उपकारागृहातील चार कोठड्यांची झाडाझडती घेतल्यानंतर शिर्डी व कोपरगावच्या 31 आरोपींना पहिल्या क्रमांकाच्या बराकीत टाकले आहे. उर्वरीत दोन बराकीत न्यायालयीन व पोलीस कोठडीतील बंदीवानांसह जामिनाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे. एका कोठडीत पाच महिला कैदी आहेत. बुधवारी कारागृहात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराचे गांभीर्य मोठे असले तरी केवळ कैद्यांची आदलाबदल करण्यात आली. 12 बाय 20 आकाराच्या कोठडीतील 20 कैदी आणि अर्धा डझन रक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला, तरीही मोबाईल सापडत नाही, हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT