PM Modi 
Latest

PM Modi : भारतात वाघांची संख्या वाढली; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आकडेवारी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी आज (दि.९) देशात सध्या अस्तित्वात असलेल्या वाघांची संख्या जाहीर केली. 2022 पर्यंत भारतात वाघांची संख्या 3 हजार 167 इतकी नोंदवली गेली आहे. भारताने केवळ वाघांना वाचवले नाही, तर त्यांची संख्या वाढण्यासाठी अनुकूल पर्यावरण निर्माण केले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला आज (दि. ९) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सहभागी झाले होते. यावेळी मोदींचे हस्ते 'वाघ संवर्धनासाठी अमृत कालचे व्हिजन' आणि 'इंटरनॅशनल बिग कॅट्स अलायन्स' (IBCA) लाँच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

'प्रोजेक्ट टायगर'चे यश केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्षावर विश्वास ठेवत नाही. आम्ही त्यांच्या सहजीवनाला महत्त्व देतो. भारत असा देश आहे जिथे निसर्गाचे रक्षण करणे हा संस्कृतीचा भाग आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अनेक व्याघ्र प्रकल्प असलेल्या देशांमध्ये त्यांची संख्या स्थिर आहे. किंवा कमी होत आहे, परंतु ती भारतात वेगाने वाढत आहे. भारताची परंपरा, भारताची संस्कृती आणि भारतीय समाजातील जैवविविधता, पर्यावरणाविषयीचा आपला नैसर्गिक आग्रह त्यास कारणीभूत आहे. आशियाई सिंह असलेला भारत जगातील एकमेव देश आहे. सिंहांची संख्या 2015 मध्ये 525 वरून 2020 मध्ये 675 पर्यंत वाढली आहे. आपल्या बिबट्याची लोकसंख्या अवघ्या चार वर्षांत 60 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे.

व्याघ्र प्रकल्पांत पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वत्र त्यांच्या उपस्थितीचा स्थानिक लोकांच्या जीवनावर आणि तेथील पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होत आहे. अनेक दशकांपूर्वी भारतातून चित्ता नामशेष झाला होता. आम्ही नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ता भारतात आणला. चित्त्याचे हे पहिले यशस्वी ट्रान्स-कॉन्टिनेंटल ट्रान्सलोकेशन आहे, असे मोदी यांनी सांगितले.

आपले पर्यावरण सुरक्षित असेल, आपली जैवविविधता सतत विस्तारत राहील. ही सर्वांची जबाबदारी आहे. G-20 अध्यक्षपदाच्या काळात त्यास सतत प्रोत्साहन देत आहोत. आदिवासी समाजाची जीवनशैली पर्यावरणासाठीची जीवनशैली समजून घेण्यासाठी खूप मदत करते. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आदिवासी समाजाच्या जीवनातून आणि परंपरेतून काहीतरी आदर्श घ्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT