Latest

नवे मराठी वर्ष यंदा १३ महिन्यांचे; श्रावण अधिकमास

मोहन कारंडे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : येत्या बुधवारपासून २२ मार्च रोजी श्री शालिवाहन शके १९४५ शोभननाम नाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. या नवीन संवत्सरात श्रावण महिना अधिक असल्याने हे वर्ष १३ महिन्यांचे असणार आहे. गुढीपाडव्याच्याच दिवशी भारतीय राष्ट्रीय सौर वर्षाचाही प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रसिध्द पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

सोमण म्हणाले की, नूतन शालिवाहन शक १९४५ हे संवत्सर २२ मार्च २०२३ पासून ८ एप्रिल २०२४ पर्यंत असणार आहे. या नूतन संवत्सरामध्ये १८ जुलै २०२३ ते १६ गस्ट २०२३ श्रावण अधिकमास आ-लेला आहे. त्यामुळे नागपंचमी, श्रीकृष्ण जयंती, गणेशचतुर्थी, नवरात्र, विजया दशमी, दीपावली हे सण १९ दिवस उशीरा येणार आहेत. ठराविक सण हे ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी भारतीय पंचांगे ही चांद्र सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असतांना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात.

कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास समजला जातो. या नूतन वर्षी कर्क राशीत सूर्य असतांना १८ जुलै रोजी आणि १७ ऑगस्ट रोजी अशा दोन चांद्रमासांचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे अधिक श्रावण आणि निजश्रावण असे दोन श्रावणमास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नूतन शालिवाहन शक वर्षामध्ये ३५० वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन येत आहे. २ जून रोजी शिवराज शक ३५० चा प्रारंभ होत आहे. शालिवाहन शके १९४५ या नूतन वर्षामध्ये एकही अंगारकी संकष्ट चतुर्थी येत नाही. सोने खरेदीसाठी सहा गुरुपुष्यामृत योग येणार आहेत. या नूतन संवत्सरामध्ये भरपूर विवाहमुहूर्त असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT