Latest

जन्मदात्या आईनेच एक लाखात मुलीला गोव्यात दाम्पत्याला विकले

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला एक लाख रुपयांच्या मोबदल्यात गोवा येथील एका दाम्पत्याला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलीची आई पूनम दिलीप ढेंगे (वय 25, मूळ रा. इंगळी, सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), तिचा मित्र सचिन अण्णाप्पा कोंडेकर (40, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थ किरण गणपती पाटील (30, रा. केर्ली, ता. करवीर) आणि गोव्यातील दाम्पत्य फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नोरोन्हा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आईसह मध्यस्थ व तिचा मित्र यांना अटक केली आहे. घरगुती वादातून हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत मुलीचे वडील दिलीप विलास ढेंगे (30, रा. इंगळी, ता. हातकणंगले) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दिलीप ढेंगे आणि पूनम यांचा विवाह 2018 मध्ये झाला आहे. त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा आणि एक वर्षाची संस्कृती नावाची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. घरगुती वादामुळे पूनम गेल्या वर्षभरापासून माहेरी पट्टणकोडोली येथे आईकडे राहते. 13 एप्रिलला फिर्यादी दिलीप यांना त्यांच्या सासूचा फोन आला. पूनम हिने लहान मुलगी कोणाला तरी दत्तक दिली असून, तुम्ही येऊन चौकशी करा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार दिलीप यांनी पट्टणकोडोली येथे जाऊन चौकशी केली असता, पत्नी पूनम ही इचलकरंजीत सचिन कोंडेकर या मित्रासोबत राहत असल्याचे समजले. दिलीपने इचलकरंजीत जाऊन चौकशी केली असता, पूनमने मुलीला आष्टा (जि. सांगली) येथील पाळणाघरात ठेवल्याचे सांगितले. दिलीप ढेंगे यांनी मुलीला आताच्या आता भेटायचे असल्याचा आग्रह धरल्यामुळे अखेर पूनमने मुलीला गोव्यातील दाम्पत्याकडे विकल्याचे सांगितले.

हद्दीच्या वादात गंभीर प्रकरणातही टोलवाटोलवी

मुलीची विक्री झाल्याचा प्रकार लक्षात येताच दिलीप यांनी हुपरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांनी पोलिसांना हकिकत सांगितली; पण पोलिसांनी त्यांना याप्रकरणी करवीर तहसील कार्यालयात नोटरी झाल्याने तेथेच तक्रार द्या, असे सांगून टोलवले. त्यानंतर दिलीप ढेंगे हे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ दखल घेऊन ढेंगे यांच्या फिर्यादिनुसार पाचजणांवर गुन्हा दाखल करून तातडीने तिघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT