Latest

चहाचे सर्वात महागडे प्रकार

Arun Patil

ख्रिस्तपूर्व 2737 मध्ये चीनचा सम्राट शेन नंग याने कॅमेलिया सिनेन्सिस या वनस्पतीची पाने उकळत्या पाण्यात टाकून पहिला-वहिला चहा बनवला होता असे म्हणतात. त्यानंतर त्याचा जगभर प्रसार झाला. सध्या चहाचे अनेक प्रकार जसे पाहायला मिळतात तसे त्यांच्या किमतींमध्येही विविधता आहे. जगातील काही महागड्या चहांची ही माहिती…

डा-हाँग पाओ टी : चीनच्या फुजियाना प्रांतात वुयी पर्वतावर वाढणारा हा चहा जगात सर्वाधिक महागडा आहे. तो दुर्मीळ असल्यानेच त्याची किंमत अधिक असून त्याला राष्ट्रीय संपत्तीचा दर्जाही आहे. हा चहा 1.2 दशलक्ष डॉलर्स प्रतिकिलो किमतीचा आहे. 2005 मध्ये हा 20 ग्रॅम चहा 30 हजार डॉलर्सना विकला गेला होता. हा विक्रीचा अत्युच्च रेकॉर्ड आहे.

पांडा डंग टी : नैऋत्य चीनमधील आन यांशी नावाच्या उद्योजकाने चहाच्या वनस्पतीची लागवड करीत असताना नैसर्गिक खत म्हणून पांडाची विष्ठा वापरली आणि पहिले उत्पादन 3500 डॉलर्सना 50 ग्रॅम चहा या भावाने विकले. अँटिऑक्सिडंट घटकांमुळे हा चहा आरोग्यवर्धक बनला. किलोमागे 70 हजार डॉलर्स या दराने हा चहा विकला जातो.

यलो गोल्ड टी बडस् : या चहाची लागवड वर्षातून एकदाच केली जाते. यामध्ये सोन्याच्या काड्या वापरून उन्हात वाळवतात. चहापत्तीवर 24 कॅरेट सोन्याचे कण विखुरले जातात. हा चहा 'सम—ाटांचा चहा' म्हणून ओळखला जातो. एका किलोमागे 7800 डॉलर्स या भावाने हा चहा विकला जातो. सोने आणि कळ्या यांच्या अफलातून मिश्रणाने या चहाला आगळी-वेगळी चव मिळते. सध्या हा चहा सिंगापूरच्या एका कंपनीतच उपलब्ध आहे.

सिल्व्हर टिप्स इम्पिरियल टी : भारतात दार्जिलिंगच्या डोंगर उतारावर मकाईबारी टी इस्टेट इथे या चहाची शेती केली जाते. चांदीच्या तारांसारख्या दिसणार्‍या कळ्या आणि पक्व फळासारखा मधुर गंध असणार्‍या या चहाची पाने तज्ज्ञ व्यक्तीकडूनच खुडून घेतली जातात व तीही पौर्णिमेच्या रात्री! 2014 मध्ये झालेल्या एका लिलावात हा चहा किलोमागे 1850 डॉलर्स या दराने विकला गेला होता.

ग्योकुरो : जपानमधील हा सर्वात उच्च प्रतीचा चहा म्हणून ओळखला जातो. 'मोत्यांचे दवबिंदू' असा 'ग्योकुरो'चा अर्थ आहे. उजी जिल्ह्यात या चहाची शेती करतात. गवती काड्यांच्या सावलीत याची लागवड करतात. या प्रक्रियेमुळे एल-थिएनिन अमिनो अ‍ॅसिड टिकवून ठेवले जाते आणि चहाचा स्वाद वाढतो. या चहाचा शोध सन 1835 मध्ये कहेई यामामाटो सहावाने लावला. एक किलो ग्योकुरो चहाची किंमत अंदाजे 650 डॉलर्स इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT