मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कोणाचा यावरून काका आणि पुतण्यात संघर्ष सुरु असताना शनिवारी अजित पवार गटाने शरद पवार गटाला जबरदस्त हादरा दिला आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करु नये, अशी याचिका अजित पवार गटाने दाखल केली होती. त्यावर म्हणणे मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार गटातील आठ आमदारांना नोटीस बजावली आहे.
आतापर्यंत शरद पवार गटातील १० आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा आठ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, शरद पवार गटासोबत असलेल्या अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांना अद्याप कोणतीही नोटीस बजावण्यात आली नाही.
ईडीच्या कारवाईमुळे सध्या वैधकीय कारणास्तव जामीनावर असलेले नवाब मलिक यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यांनाही कोणतीही नोटीस बजावली नाही.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली होती. या फुटीचे नेतृत्व करणारे अजित पवार यांच्यासोबत ४३ आमदार गेले आहेत. त्यापैकी मंत्री झालेल्या ९ जणांवर अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शरद पवार गटाने पत्र दिले आहे. इतकेच नाहीतर या गटाने पक्षावर दावा करत चिन्हही आपलेच असल्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. याबाबत सुनावणी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षांनी आठ आमदारांना अपात्र करण्याबाबत नोटीस बजावल्यामुळे आता काका आणि पुतण्यामध्ये संघर्ष इरेला पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.