Latest

बारामती : बदला घेतल्याची भाषा दुदैवी; खा. सुप्रिया सुळे यांची नाव न घेता फडणवीस यांच्यावर टीका

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासंबंधी सध्या जे चालले आहे, ते अस्वस्थ करणारे आहे. देशमुख, मलिक व राऊत कुटुंबिय कोणत्या परिस्थितीतून जातेय हे मी पाहते आहे. राज्याने यापूर्वी राजकीय कटूता पाहिली होती. परंतु गेल्या आठवड्यात एका भाजप नेत्याच्या तोंडी बदला हा शब्द आहे. त्यांनी हो मी बदला घेतला असे विधान केले. त्यांची ही भाषा अत्यंत दुदैवी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता व्यक्त केले.

बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, ज्या संस्कृतीत मी वाढले, ती ही संस्कृती नाही. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो. त्यात विरोधक हा वैचारिक विरोध करत असतो. त्यात बदल्याची भाषा नसते. बदला घेतल्याची भाषा मी पहिल्यांदा एकली. हे अतिशय दुदैवी आहे. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते पाहता विरोधकांचे ते पुढील टार्गेट असावेत. महाराष्ट्राने इतके गलिच्छ राजकारण यापूर्वी पाहिले नव्हते, असेही त्या म्हणाल्या.

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी केली आहे, यावर त्यांनी या मागणीला आमचा पाठींबा असेल असे स्पष्ट केले. काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल सुरु असलेल्या गदोराळासंबंधी त्या म्हणाल्या, विरोधकांकडे बोलण्यासाठी सध्या काहीही उरलेले नाही. त्यामुळे ते जुनेच विषय उगाळून काढत आहेत. या विषयावर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे.

खा. संजय राऊत यांचा जामिन रद्द व्हावा अशी मागणी इडीने केली असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून ऑर्डर येत नाही, तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही. त्यांची मागील ऑर्डर मी पूर्णपणे वाचली. त्यात त्यांच्यावर झालेली कारवाई पूर्णतः चुकीची असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे फारशी चिंता करावी असे मला वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. हर हर महादेव चित्रपटासंबंधी त्या म्हणाल्या, एखादा सिनेमा इतिहासावर असेल तर किती लिबर्टी घ्यावी हे पाहिले पाहिजे. हा विषय आता राजकीय नसून सामाजिक झाला आहे. छत्रपतींचा कोणी चुकीचा इतिहास दाखवत असेल तर त्याचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. केंद्रीय मंत्री अमित शहा पुण्यात शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत असून त्यांचे स्वागत असल्याचे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT