ज्ञानेश्वर बिजले :
पुणे : सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील तालुक्यांत जुलैमध्ये पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. गेल्या दीड महिन्यात पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत आजपर्यंत 55 टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यांत पावसाने ओढ दिल्याने पेरण्या मात्र केवळ 31 टक्केच झाल्या आहेत. मावळ, भोर, वेल्हे या तालुक्यांत 80 टक्क्यांपेक्षा अधिक; तर मुळशी, खेड, आंबेगाव तालुक्यांत 60 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुक्यांत मात्र तेथील सरासरीच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पुणे शहरात सरासरीच्या तुलनेत 50 टक्के पाऊस पडला.
जूनमध्ये जिल्ह्यात पावसाने ओढ दिली होती. त्या महिन्यात जिल्ह्यात 51 टक्के पाऊस पडला. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस झाला, तर जुलैमध्ये 18 तारखेपर्यंत 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात सरासरीच्या तुलनेत 74 टक्के पेरण्या झाल्या. त्या तुलनेत पुणे जिल्ह्यात 31 टक्के पेरण्या झाल्या. पुणे जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र एक लाख 95 हजार 710 हेक्टर आहे. त्यापैकी 61 हजार 428 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्याची आकडेवारी पाहिल्यास सरासरी 142 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 104 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी विभागातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात तृणधान्याची पेरणी सरासरीच्या तुलनेत 17 टक्के क्षेत्रावर, तर कडधान्याची पेरणी 14 टक्के क्षेत्रावर झाली आहे. सोयाबीनमुळे गळीत धान्याची सरासरीच्या तुलनेत 94 टक्के पेरणी झाली आहे.
सोयाबीनकडे कल
जिल्ह्यात पेरण्या कमी झाल्या असल्या, तरी शेतकर्यांचा कल सोयाबीनकडे वळला आहे. झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी 32 हजार 850 हेक्टरवर (53 टक्के) सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ती 157 टक्के आहे. कापसाची पेरणी सरासरी 50 हेक्टर असताना, यंदा ती 756 हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यातील ज्वारीचे सरासरी क्षेत्र 607 हेक्टर असताना यंदा केवळ 4 हेक्टरवर म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी आत्तापर्यंत झाली आहे.
हे ही वाचा :