नवी दिल्ली; वृत्तसंस्था : इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून काही फारसे बरे चाललेले नाही. कधी आप व काँग्रेसमध्ये मतभेद, कधी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसमध्ये मतभेद, कधी म्हणे ममता बॅनर्जी, तर कधी म्हणे नितीशकुमार, तर कधी म्हणे मल्लिकार्जुन खर्गे नेते, तर कधी आणखी काय काय… इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हापासूनच या आघाडीला धक्के बसत आहेत. गेल्या 10 दिवसांतच इंडिया आघाडीला हे 4 धक्के बसले आहेत. लोकसभेच्या 96 जागांवर यातील 3 धक्क्यांचे हादरे जाणवणार आहेत. इंडिया आघाडीपुरते बोलायचे, तर घटक पक्षांना या जागांच्या वाटपावर पुन्हा कसरत करावी लागणार आहे.
मला मोदीजींना हे आवर्जून सांगायचे आहे की, आम्ही तुमचे कधीच शत्रू नव्हतो. आजही आम्ही शत्रू नाही. आम्ही तुमच्यासोबत होतो. गेल्या वेळी आम्ही तुमच्यासाठीच प्रचार केला होता, असे विधान उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील एका सभेत केले. गेल्या आठवड्यातच जनता दल युनायटेडचे नेते तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे लालू यादव यांच्या राजदची आणि सोबतच इंडिया आघाडीची साथ सोडून पूर्ववत भाजपच्या गोटात दाखल झाले होते. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचाही सूर बदलला. गेल्या दहा दिवसांतच इंडिया आघाडी 3 मोठे धक्के बसलेले होते. मोदींचे कौतुक करून उद्धव ठाकरेंनी हा चौथा धक्का दिला.
तृणमूल काँग्रेस स्वबळावर
पहिला धक्का इंडिया आघाडीला पश्चिम बंगालमध्ये बसला. तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 24 जानेवारी रोजी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. जून 2023 मध्ये झालेल्या इंडियाची पहिल्याच बैठकीत काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये 10 ते 12 जागांची मागणी केली होती. ममता बॅनर्जी तेव्हाही बेरहामपूर आणि मालदा दक्षिण या दोनच जागा द्यायला तयार झाल्या होत्या. मुळात या दोन्ही जागांवर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसनेच विजय मिळविलेला आहे. ममता यांचा मुख्य विरोधी पक्ष खरे तर सीपीएमच होता. भाजप आता झालेला आहे. सीपीएमहीसोबत असलेल्या इंडिया आघाडीत ममता यांना नकोसे झालेले आहे, याउपरही ममता यांनी अधिकृतपणे इंडिया आघाडी सोडलेली नाही.
नितीशकुमार एनडीएमध्ये
दुसरा धक्का : नितीशकुमार हे एनडीएमध्ये दाखल झाले. आता बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसमध्ये जागांवरून वाद होतील. जूनमध्ये पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानीच इंडिया आघाडीच्या 27 पक्षांची पहिली बैठक झाली होती. नितीश यांच्या नेतृत्वाखालीच ही आघाडी पुढे सरकत असताना व इंडिया आघाडीकडून नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जात असताना, त्यांनीच आघाडीवरून आपल्या नेतृत्वाचे छत्र काढून घेतले. पूर्वी ते इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री होते. आता एनडीएचे मुख्यमंत्री आहेत.
नितीश यांच्यानंतर आता राजद नेते लालूप्रसाद यादव हे बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर असतील. अर्थात त्यांच्यामागेही चौकशांचा ससेमिरा आहेच; पण याउपर जागावाटपात काँग्रेसवर त्यांचा दबाव असेल. राजदला 20 वर जागा हव्या असतील.
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटकेच्या रूपात इंडिया आघाडीला तिसरा धक्का बसला. हेमंत सोरेन हे झारखंडमधील इंडिया आघाडीचे आधारस्तंभ होते. 30 जानेवारीला त्यांना अटक झाली. मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला. झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. काँग्रेसला येथे 9 जागा हव्या आहेत.
हेही जाणून घ्या…
सक्त वसुली संचालनालयाने अलीकडेच खिचडी प्रकरणात सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याचे सांगितले जाते.
क्रीडा कोट्यातील जमिनीवर पंचतारांकित हॉटेल बांधल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना दोनदा चौकशीसाठी बोलावण्यात आलेले आहे. वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.