वॉशिंग्टन : संयुक्त अरब अमिरातीचा अंतराळवीर सुल्तान अल नेयादी सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहे. पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या या अंतराळ स्थानकावरील सहा महिन्यांच्या मोहिमेत हा अंतराळवीर सहभागी झालेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अंतराळ स्थानकावर केस कसे कापतात याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. आता त्याने अंतराळातून टिपलेली हिमालयाची छायाचित्रे सोशल मीडियात शेअर केली आहेत. 'अंतराळातून हिमालय' अशी कॅप्शन त्याने दिली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर त्याने ही छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यामध्ये दोन छायाचित्रे असून 'नगाधिराज' हिमालयाचे विहंगम द़ृश्य दिसते. 'अंतराळातून हिमालय…एव्हरेस्ट शिखराचे घर…पृथ्वीवरील समुद्रसपाटीपासूनचा सर्वात उंच बिंदू… हा पर्वत आपल्या ग्रहाच्या समृद्ध प्रकृतीच्या प्रतिष्ठित स्थळांपैकी एक आहे'.
अल नेयादीच्या या पोस्टला 44 हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आणि सहाशेहून अधिक लाईक्सही मिळाले. अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अल नेयादीने मे महिन्यात अंतराळातून दुबईनगरी कशी दिसते याची प्रतिमा शेअर केली होती. दुबईचे पाम जुमेराह, जेबेल अली आणि जुमेराह व्हिलेज सर्कलसहीत अनेक भागांची छायाचित्रे त्याने शेअर केली होती.