लोणी काळभोर :सिताराम लांडगे : चंदनचोरांची हातात आलेली एक टोळीच पोलिसांनी सोडून देऊन घटनास्थळी काहीच सापडले नाही असा कांगावा करण्याचा प्रकार दौड तालुक्यात घडला आहे. चंदनचोरांची एक टोळी दौंड तालुक्यात सक्रिय आहे मागील आठवड्यात चोरलेल्या चंदनाच्या झाडांचा साठा करुन झाडे कापून त्यातील चंदनाचा गर काढण्याचे काम एका ठिकाणी चालू होते, याची अधिकृत खबर स्थानिक पोलीसांना देण्यात आली होती पोलीस त्या ठिकाणी पोहचलेही सर्व मुद्देमाल सापडला परंतु पोलीसांनी कोणतीच कारवाई न करता चोरांना चंदनासह सोडुन दिले व तात्काळ माल येथुन हलविण्याचा सल्ला दिला व ज्याने खबर दिली त्याला सांगितले येथे काहीच आढळून आले नाही.
परंतु घटनास्थळी चंदनचोरांचा माल काढण्याचा कार्यक्रम कॅमेर्यामध्ये कैद झाला होता या ठीकाणी तब्बल आठशे किलो चंदन होते त्याचे बाजारमुल्य कोट्यवधी रुपयांच्या घरात होते छाप्यामध्ये रंगेहाथ चोरासह मुद्देमाल सापडला असताना केवळ आर्थिक लोभापाई.पोलिसांनी कारवाई केली नाही व जिल्ह्यात सर्वात मोठी चंदन चोरी करणारी टोळी सापडली असताना खुलेआम सोडून दिले. या गंभीर घटनेची चौकशी ग्रामीण पोलिस विभागाचे प्रमुख करणार का असा सवाल जिल्ह्यात सुरू आहे .
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मौल्यवान असलेल्या चंदनाची झाडे चोरणार्या टोळ्यांचा उच्छाद झाला आहे. खुलेआम चंदनाची तस्करी करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या वरदहस्तामुळे सक्रिय झाली आहे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी या टोळीवर कायदेशीर पायबंद घालणे गरजेचे आहे. चंदनाच्या झाडांचा उपयोग अनेक नामांकित कंपन्या परफ्यूम, औषधे, साबण , अगरबत्ती, सौंदर्यप्रसाधने यात करतात. औषधासाठी सुद्धा चंदनाचा वापर केला जातो व या झाडांचे चंदनाचा गर लाखो रुपयांना विकला जातो या चंदनाचा दर प्रत्येकी किलोला बारा ते चौदा हजार रुपये मिळतो.
चंदनाची झाडे तोडण्यास बंदी आहे असे असतानाही पोलिसासह वन विभागाचेही चंदनाच्या झाडाची तोड होत असताना दुर्लक्ष होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील वाड्यावस्त्या वरील शेतकर्यांच्या शेतातील चंदनाची झाडे रात्री किंवा पहाटे चोरट्या पद्धतीने कापुन त्याची तस्करी केली जाते झाडे चोरणार्या टोळ्या ग्रामीण भागात सक्रिय आहेत, अशीच टोळी सापडलेली असताना सोडून देण्यात आली आहे.