file photo  
Latest

पुरुषांमध्ये वाढली देखणेपणाची हौस; ‘मेन्स ग्रुमिंग इंडस्ट्री’ची कमाईही वाढली

Arun Patil

वॉशिंग्टन : 'सुंदर मी होणार' असे म्हणत अनेक महिला सौंदर्यवृद्धीसाठी वेगवेगळे प्रकार करीत असतात. मात्र याबाबत पुरुषही मागे नाहीत, असे दिसून आले आहे. पुरुषांमध्येही आपण देखणे दिसावे याची हौस वाढली असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच 'मेन्स ग्रुमिंग इंडस्ट्री'ची कमाईही वाढली आहे. दाढी-त्वचेसाठी अनेक लोक वेगवेगळे प्रॉडक्ट, ट्रिटमेंट घेत आहेत. त्यामुळे 'मेन्स ग्रुमिंग इंडस्ट्री' 2028 मध्ये 9.4 लाख कोटी रुपयांची होईल असा अंदाज आहे!

नव्वदच्या दशकातील जाहिराती अनेकांना आठवत असतील. रेजरची तुलना रेसर कार किंवा जेटशी केली जात होती. शॉवर जेलच्या गंधाची तुलना वाईल्ड क्रिचर्सशी होत असे. शेल्फमध्ये पुरुषांसाठीची उत्पादने काळ्या किंवा नियॉन रंगाच्या पॅकमध्ये ठेवली जात असत. 'वन साईज फिट फॉर ऑल'च्या धर्तीवर त्यांना बाजारात आणले जात असे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. पुरुषही आता आपल्या लूकबाबत 'अलर्ट' झाले आहेत. हेअर, स्किनपासून बोटोक्स ट्रीटमेंटपर्यंत अनेक मंडळी वेळ आणि पैसा खर्च करीत आहेत. स्टेटिस्टाच्या माहितीनुसार मेल ग्रुमिंगचा बाजार 2022 पर्यंत 6.57 लाख कोटी रुपये होता. 2028 पर्यंत तो 9.4 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचेल. मेल ग्रुमिंगच्या ग्लोबल मार्केटमध्ये स्किन केअरचा हिस्सा 45 टक्के आहे.

दुबईतील चर्चित सलून व स्पा द ग्लास हाऊसचे संस्थापक डॉ. कॅरोलिन ब्रुक्स यांनी सांगितले की, सध्या पुरुषांचा फोकस हा हेअर स्टायलिंग, दाढी व पर्नलाइज्ड ग्रुमिंगवर आहे. अस्ताव्यस्त केसांचा लूक पुरुषांमध्ये वेगाने नावडता बनत चालला आहे. सध्याचा ट्रेंड शानदार दिसण्याच्या आवडीचा आहे. चांगल्या प्रकारे ठेवलेली दाढी पौरुषत्व आणि आत्मविश्वास वाढवते, अशी धारणा बनत चालली आहे. टिफनी एपीच्या फॅशन बिझनेसवरील एका ताज्या रिपोर्टनुसार चीनमध्ये 2020 पर्यंत पुरुषांची स्किन केअर इंडस्ट्री 14 हजार कोटी रुपयांची होती. ती 2026 मध्ये 23 हजार कोटी रुपयांची होईल.

कोरोना महामारीच्या दीर्घ लॉकडाऊनच्या काळात महिला आणि पुरुष अशा दोघांनीही स्किन केअरवर अधिक लक्ष केंद्रित केले. प्रतिबंध हटल्यानंतर लोकांमध्ये सेल्फ केअरचे वेड जणू काही डोक्यावरच चढून बसले. ही संधी साधून अनेक ब्रँडस्नी वेगवेगळी उत्पादने लाँच केली. पुरुषांचा ऑर्गेनिक उत्पादनांवरील विश्वासही वाढत असल्याचे दिसून आले आहे. ते स्वतः फेशिअल करण्याबरोबर अशा उत्पादनांचा वापर करू लागले आहेत. त्वचेला पोषण देण्यासाठी आयव्ही ड्रिप लावू लागले आहेत. एक्सफोलिएटर, स्क्रब आणि लोशन त्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहेत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT