पुणे : पुढारी वृत्तसेवा : सहकार विभागातील सरळ सेवेची रिक्त ३०९ पदे भरण्याकरता उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची 21 जुलैपर्यतची असलेली मुदत आता 24 जुलैअखेर रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय सहकार आयुक्तालयाने घेतला आहे. जाहिरातीनुसार सद्यस्थितीत ४० हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. वाढीव मुदतीमुळे ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या अर्जदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. सहकार विभागातील सरळ सेवा कोट्यातील गट संवर्गातील ( कनिष्ठ लिपिक व वाहन चालक वगळून) रिक्त पदांच्या भरतीबाबत ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची जाहिरात 6 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक 21 जुलै होता. मात्र, शुक्रवारी काही तांत्रिक कारणाने संकेतस्थळ कार्यान्वित नसल्याने उमेदवारांना दिलेल्या कालावधीत अर्ज भरता आलेले नाही. ही बाब विचारात घेऊन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास 24 जुलै रोजीच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. संकेतस्थळावर ६ जुलै रोजी प्रसिद्ध जाहिरातीमधील अटी व शर्ती कायम राहतील असेही त्यांनी नमूद केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सरळ सेवा कोट्यातील सहकार विभागातील गट क संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी एकूण 309 जागा आहेत.
त्यामध्ये सहकार आयुक्तालयातील ९ जागांसह राज्यातील विभागीय सहनिबंधक कार्यालयातील उर्वरित पदे आहेत. या पदांमध्ये लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, सहकारी अधिकारी श्रेणी एक, सहकारी अधिकारी श्रेणी दोन, लेखापरीक्षक श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक किंवा सहाय्यक सहकारी अधिकारी आणि लघु टंकलेखक या पदांचा समावेश असल्याची माहिती आयुक्तालयातून देण्यात आली.
हे ही वाचा :