Narendra Modi 
Latest

तो दिवस दूर नाही जेव्हा भारतीय ‘मेड इन इंडिया’ विमानाने प्रवास करतील : पंतप्रधान मोदी

मोहन कारंडे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : भारतातील विमानचालन बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे. देशाला हजारो विमाने आणि तरुणांच्या श्रमशक्तीची गरज भासेल. भारत सध्या विमाने आयात करत आहे, पण तो दिवस दूर नाही जेव्हा भारतीय 'मेड इन इंडिया' प्रवासी विमानांमध्ये उड्डाण करतील. असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. शिवमोग्गा येथील आधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळाचे सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.

पूर्वी लहान शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु, भाजप सरकारने शेती व शेतकर्‍यांचा विकास हाच ध्यास घेतला आहे. 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा देशाचे कृषी बजेट 25 हजार कोटींचे होते, ते आता 1 लाख 25 हजार कोटींवर गेले आहे. नऊ वर्षांत पाच पटीने वाढलेले कृषी बजेट हे सामान्य शेतकर्‍यांच्या विकासाचे द्योतक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तुम्ही माझ्यावर हे जे प्रेम दाखवले व आशीर्वाद दिला आहात त्या प्रेमाची मी कर्नाटक व बेळगावचा विकास करून व्याजासह परतफेड करेन, अशी भावनिक साद घालत पंतप्रधानांनी जाहीरही न झालेल्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

जुने बेळगावजवळच्या येडियुराप्पा मार्गावरील मालिनी सिटीमध्ये पंतप्रधानांची सोमवारी सभा झाली. नव्याने बांधण्यात आलेले बेळगावचे रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, शेतकर्‍यांना मदतनिधीचे वितरण तसेच 2240 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांनी रिमोटद्वारे उद्घाटन केले. सन 2023 हे कडधान्य वर्ष म्हणून साजरे होत असताना पंतप्रधानांच्या हस्ते नऊ कडधान्यांचे मातीत रोपण कडधान्य वर्ष साजरे करण्यात आले.

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करताना नऊ वर्षांतील भाजपच्या कामाचा लेखाजोखा मांडला. पूर्वीचे सरकार 85 टक्के असलेल्या लहान शेतकर्‍यांकडे लक्ष देत नव्हते. परंतु, आमच्या सरकारने शेतकरी आणि कृषी विकासाला प्राधान्य दिले आहे. किसान सन्मानच्या 13 व्या हप्त्याचे 16 हजार कोटी शेतकर्‍यांच्या थेट खात्यावर बेळगाव येथून जमा झाले आहेत. ही शेतकर्‍यांसाठी होळीची भेट आहे. यापूर्वी अडीच लाख कोटींची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

आज 16 हजार कोटींची रक्कम जमा केली. यामध्ये कोणी एजंट नाही, भ्रष्टाचार नाही किंवा कोणाला कसलीही लाच द्यावी लागलेली नाही. काँग्रेसच्या काळात 1 रुपया निधी आला की जनतेपर्यंत 15 पैसे पोहोचत असत. जर काँग्रेस सरकारने 16 हजार कोटी रु. असे शेतकर्‍यांना दिले असते तर त्यातील 12-13 हजार कोटी मधेच गिळंकृत झाले असते. पण, भाजप सरकारमध्ये तसे होत नाही.

पंतप्रधान पुढे म्हणाले, काँग्रेसला आजही वाटते की मोदी जिवंत असेपर्यंत आपली डाळ काही शिजणार नाही. परिवारात अडकलेल्या अनेक पक्षांच्या जोखडातून देशाला बाहेर काढत विकास करत कमळ फुलवणे मोदी कधीही सोडणार नाही.

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, देशातील 85 लाख शेतकरी किसान सन्मान योजनेशी जोडले गेले आहेत. अन्नधान्य उत्पादनात देश स्वावलंबी बनत आहे. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, शेतकर्‍यांसाठी किसान सन्मान, विद्यानिधी यासह विविध योजना सामान्यांसाठी देणार्‍या पंतप्रधान मोदींचे मी आभार मानतो. मंत्री प्रल्हाद जोशी स्वागत भाषणात म्हणाले, बेळगावातील रोड शो आणि या सभेने इतिहास निर्माण केला आहे. जय जवान, जय किसान आणि जय अनुसंधान या तत्वाने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे, बेळगावच्या खा. मंगल अंगडी, चिकोडीचे खा. आण्णासाहेब जोल्ले, खा. इराण्णा कडाडी, पालकमंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, आ. लक्ष्मण सवदी, आ. श्रीमंत पाटील, आ. भालचंद्र जारकीहोळी, आ. रमेश जारकीहोळी, आ. अभय पाटील, आ. अ‍ॅड. अनिल बेनके यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, सर्व आमदार उपस्थित होते. विनायक मोरे व टीमच्या स्वागतगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मुख्यमंत्र्याच्या हस्ते शाल, पालकमंत्र्यांकडून फेटा, खा. अंगडी व मंत्री जोल्ले यांच्या हस्ते सौंदत्ती यल्लम्मा देवीची प्रतिमा, खा. जोल्लेंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पंतप्राधानांचा सत्कार झाला.

*आपले स्फूर्तीस्थान संत बसवेश्वर असे म्हणत मोदींची कन्नडमध्ये भाषणाला सुरवात.
*बेळगावच्या धर्तीवर येणे हे एखाद्या तीर्थयात्रेपेक्षा कमी नाही
*कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णांच्या भूमीत आता नवनिर्मितीच्या लढाईची गरज
*आम्ही स्टार्टअप आता सुरू केले. परंतु, बेळगावच्या भूमित 100 वर्षांपूर्वी बाबुराव पुसाळकर यांनी स्टार्ट-अप ही संकल्पना राबवली होती
*कर्नाटकात रेल्वेमार्ग दुपदरीकरण, रेल्वेस्थानक नूतनीकरण, विमानतळ विकास, बहुग्राम पाणी योजना यातून कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी प्रयत्न
*रेल्वे प्रकल्प विकासाठी राज्यासाठी साडेसात हजार कोटींचा निधी, पैकी 4 हजार कोटींची कामे मार्गी
*किसान सन्मान योजनेतील अडीच लाख कोटींपैकी 50 हजार कोटी महिला शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा
*प्रधानमंत्री प्रणाम योजनेंतर्गत सेंद्रिय शेती करणार्‍या राज्यांना जादा निधी देणार
*कर्नाटकातील ऊस क्षेत्र पाहता साखर उत्पादन सहकार खात्याला 2016-17 च्या पूर्वीच्या बिलात सूट देण्यासाठी 10 हजार कोटींचा निधी
*इथेनॉल उत्पादनावर जोर, पूर्वी पेट्रोलमध्ये 1.5 टक्के मिसळण्याचे प्रमाण आता 10 टक्क्यांवर नेले. भविष्यात ते 20 टक्के होण्यासाठी प्रयत्न
*2019 पर्यंत देशभरात 25 टक्के लोकांकडे नळाचे पाणी, आता हे प्रमाण 60 टक्क्यांवर
*बेळगावातील रोड शो आणि सभेची अभूतपूर्व गर्दी पाहून मी भारावलो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT