सातारा; पुढारी वृत्तसेवा : इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील दरडीखाली विसावलेल्या गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सातारा-यवतेश्वर-कास या घाटातील धोकादायक दरडी फोडण्याची जोखीम प्रशासनाने उचलली आहे. सोमवार, दि. 24 रोजी मृत्यू डोक्यावर असणार्या यवतेश्वर घाटातील खाणीजवळील दरडी अद्ययावत मशिनरींच्या सहाय्याने फोडण्यात येणार आहेत. भरपावसात प्रशासन ही लढाई लढणार असून मोहीम फत्ते झाल्यानंतर हे ठिकाण भयमुक्त होणार आहे.
सातारा-यवतेश्वर-कास या मार्गावर सध्या पर्यटकांची मांदियाळी आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण या मार्गावर प्रवास करत आहेत. त्याचबरोबर सकाळी मॉर्निंग वॉकलाही या मार्गावर जाणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र, घाटातील दगडखाणीजवळ महाकाय कड्याचा भाग केव्हा कोसळेल याचा नेम नाही. ही धोकादायक दरड हटवण्याचे काम प्रशासनाने आता हाती घेतले आहे. सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस, महसूल, नगरपालिका विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 8.30 वाजता ही मोहीम सुरु केली जाणार आहे. त्यामुळे दि. 23 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून दि. 24 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर-कास हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे. शेजारील दरे ग्रामस्थांनाही परिसरात मनाई करण्यात आली आहे.
या घाटापासून 200 ते 300 मीटर परिसरात जनावरे तसेच व्यक्तींच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये यासाठी महादरे गावच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामासाठी तसेच गुरे राखण्याकरता किंवा इतर कारणांसाठी नागरिकांना मनाई आहे. धोकादायक कड्याबरोबरच लगतच्या लहान मोठ्या दरडी हटवल्या जाणार आहेत.