Latest

Thane : ठाणे महापालिका अधिकारी झाले आता ठेकेदाराविरुध्द कारवाईची नोटीस

backup backup

निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Thane) यांनी दिले. यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारांस नोटीस बजावण्यात आली आहे.

रस्ते दुरूस्तीची कामे तात्काळ व गुणवत्तापूर्ण न केल्यास गुन्हा दाखल करून कंपनीस काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका (Thane) हद्दीतील रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर कामे दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत व नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

यावेळी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करणेबाबत व त्यांचे विरुध्द कारवाई करणेबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित ठेकेदाराची जबाबदारी

संबंधित ठेकेदारास शक्तिपीठ मानपाडा ते नागलाबंदर मलप्रक्रिया केंद्र व युनी ॲपेक्स कंपनी ते शिवमंदिर गायमुख दरम्यानच्या रस्त्याचे काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे.

या भागातील डांबरीकरण पूर्ण न झालेल्या भागाचे (रस्त्याची डावी बाजू ) सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय , कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल व गायमुख ते भाईदरपाडा गाव, वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक
( रस्त्याची उजवी बाजू ) या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरुन व तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीस योग्य ठेवणे ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे.

परंतु संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सूचना देवूनही या रस्त्याच्या सुरज वॉटर पार्क ते एमटीएनएल कार्यालय, कॉसमॉस ज्वेल्स ते कासारवडवली सिग्नल, पानखंडा रोड ते नागलाबंदर सिग्नल व तसेच गायमुख ते भाईंदरपाडा गाव, वाघबिळ चौक ते पातलीपाडा चौक या भागात काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे या सर्विसरोडचा वापर नागरिकांना करता येत नसून महामार्गावर काेंडी होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

अवघ्या काही दिवसात रस्त्यावर खड्डे

 या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरुस्त झाले आहे.

यामुळे यापूर्वी केलेले काम योग्य दर्जाचे न झाल्याचे निदर्शनास आल्याने ठेकेदाराने केलेल्या व नादुरुस्त झालेल्या कामांचे देयक महापालिकेच्यावतीने (Thane) अदा करण्यात येणार नसल्याचे नोटीसीमध्ये स्पष्ट केले आहे.

बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पूर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनूसार दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये,  याचा खुलासा तीन दिवसांत करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत.

सदर कामासोबतच या तीन दिवसांच्या कालावधीत कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखून काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, सर्व कामे तात्काळ न केल्यास नागरिकांना गैरसोय निर्माण केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल करून संस्थेस काळ्या यादीत टाकण्याचा ईशाराही महापालिकेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT