Latest

Thane Lok Sabha Election : ठाण्याचा सुटेना उमेदवारीचा तिढा

अनुराधा कोरवी

उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा आणि नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटच लढविणार असल्याचा दावा केला जात असला, तरी उमेदवारांची अधिकृत घोषणा होत नसल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठाणे आणि नाशिक हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे शिवसेनेचे बालेकिल्ले असून, येथील दोन्ही खासदार शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे यांची साथ दिल्याने ठाण्याच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला तो अद्याप कायम आहे. दुसरीकडे भाजपला शिवसेनेकडील इच्छुक उमेदवार हे पसंतीस पडत नसल्याचे चित्र आहे. शिवसेना फुटल्याने भाजपने स्वतःच्या ताकदीची आठवण करून देत ठाण्यावर दावा ठोकला आहे. ठाणे लोकसभेतील सहापैकी चार आमदार हे भाजपचे असून, नगरसेवकांची संख्याही शिवसेनेपेक्षा अधिक असल्याचा दावा केला आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजपकडून प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.

ठाण्याची जागा मिळत नसेल, तर आमच्या मर्जीतील उमेदवार घेऊन शिवसेनेने निवडणूक लढवावी, असा दबाव भाजपकडून वाढत असल्याने शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. दिवंगत आनंद दिघे यांची कर्मभूमी असलेली ठाण्याची जागा पुन्हा भाजपला सोडल्यास विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठेल, तसेच कट्टर शिवसैनिक हे ठाकरे गटाकडे पुन्हा वळतील, अशी भीती सेना नेत्यांना सतावू लागली आहे. भाजपचा बालेकिल्ला असतानाही दिवंगत आनंद दिघे यांनी 1996 मध्ये ठाणे लोकसभा ही भाजपकडून खेचून घेतली आणि आजपर्यंत शिवसेनेचा भगवा कायम फडकवत ठेवला आहे.

ठाणे भाजपकडे गेल्यास आगामी विधानसभा आणि ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तीन महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला फटका बसेल आणि मुख्यमंत्री शिंदे यांची ताकद कमी होईल. मुख्यमंत्र्यांचे ठाणे असताना खासदार हा त्यांच्या पक्षाचा नाही, याचे शल्यही शिवसेनेला कायम सतावत राहील. त्यापेक्षा या घटनेची आठवण ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून वारंवार करून दिली जाईल. त्यामुळे ठाण्याची जागा ही शिवसेनाच लढणार असून, उमेदवार कोण असेल हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. भाजपकडून उमेदवार आयात होण्याची शक्यता असल्याने उमेदवाराची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक-दोन दिवस आधी करण्याची रणनीती आखण्यात आल्याचे समजते. असाच प्रकार नाशिक लोकसभा मतदार संघात आहे.

नाशिकमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने नाशिकची जागा ही शिवसेनाच लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्यापैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरविण्याची रणनीती शिंदे गटाकडून आखण्यात येत आहे. मात्र, उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर करून महायुतीमधील नाराजीवर पडदा पाडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT