Latest

नात्यातील विवाहामुळे होतो थॅलेसेमिया : तज्ज्ञांकडूनही दुजोरा

मोहन कारंडे

सातारा : मीना शिंदे : जुन्या पिढीतील नातेसंबंध व आपुलकीची नाळ कायम राखण्यावर कुटुंबातील ज्येष्ठांची मदार राहत आहे. त्यासाठी नवीन पिढीतील मुला-मुलींचे नात्यातच विवाह जुळवले जात आहेत. मात्र, या नात्यातील विवाहामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार्‍या थॅलेसेमिया या आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे दाहक वास्तव वैज्ञानिक संशोधनामुळे समोर येऊ लागले आहे. तसेच गतिमंद, मतिमंदतेचा धोका वाढत आहे. व्यंग व विविध आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

थॅलेसेमिया हा हिमोग्लोबिनची कमतरता, आनुवंशिकता व रक्तात आढळणारे दोष यामुळे होतो. एकाच नात्यातील किंवा एकाच कुळातील व्यक्तीचे लग्न झाल्यास त्यांची नाडी एक आल्याने अशा आई-वडिलांच्या पोटी जन्मणार्‍या बाळांमध्ये जन्मावेळी किंवा नंतर काही गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. बाळ जन्मल्यानंतर सहा ते आठ महिन्यांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. थॅलेसेमिया बाधित असणार्‍या मुलाच्या शरीरामध्ये लाल रक्त पेशी वेगाने कमी होत जातात आणि नवीन पेशींची निर्मितीदेखील होत नाही. या मुलांच्या शरीरात नेहमी रक्ताची कमतरता निर्माण होत असते. सर्वसामान्य शरीरामध्ये 125 दिवसापर्यंत आरबीसी (रक्तातील लाल पेशी) जिवंत राहतात. मात्र, थॅलेसेमिया या आजारपणात आरबीसी फक्त 10 ते 25 दिवसांपर्यंत शरीरामध्ये टिकत असल्याने अशा रुग्णांना 20 ते 25 दिवसांनंतर रक्त चढवावे लागते.

सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 475 थॅलेसेमियाचे रुग्ण उपचार घेत असून त्यामध्ये जिल्ह्यातील 150 रुग्णांचा समावेश आहे. थॅलेसेमिया वाहक रुग्णांना विशेष लक्षणे जाणवत नसल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. सिकल पेशी रक्तक्षय हा एक आनुवंशिकतेने होणारा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला सिकल पेशी रक्तक्षय होण्यासाठी उत्परिवर्तीत जनुकांच्या दोन प्रती आवश्यक असतात. ज्या व्यक्तीना आनुवांशिकतेने दोन्ही पालकांकडून उत्परिवर्तीत हिमोग्लोबिन प्रथिने जनुक मिळते. त्यांना सिकल पेशी रक्तक्षय होतो आणि ज्यांना आनुवांशिकतेने एकाच पालकाकडून जनुक मिळते, त्यांना सिकल पेशी ट्रायट असतो. या रुग्णांना आयुष्यभर ब्लड ट्रांसफ्यूजन आणि आयरन चिलेशनची आवश्यकता लागते. या दोन्ही रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे एकमेव पर्याय आहे. परंतु फक्त 20 ते 25 टक्के रुग्णांना त्यांच्या परिवाराकडून एचएलए आयडेंटिकल डोनर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे सुमारे 70 टक्के रुग्णांना रक्त चढवणे हा एकमेव पर्याय उपलब्ध होतो. नात्यातील लग्नामुळे जन्मलेल्या अपत्यामध्ये गतिमंद व मतिमंदतेसह शारीरिक व्यंग निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नात्यात लग्न टाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

थॅलेसेमिया लक्षणे व उपचार

थॅलेसेमिया आजाराची लक्षणे अगदी सामान्य आहेत. सतत अशक्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटात सूज येणे, गडद लघवीला होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, त्याचबरोबर नखे, डोळे आणि जीभ फिकट होणे, मुलांची वाढ मंदावणे ही या आजाराशी संबंधित काही लक्षणे आहेत. थॅलेसेमियावर बोन मॅरो ट्रान्स्प्लांट हा एकमेव उपचार आहे. परंतु, हे दुर्दैव आहे की, केवळ 20 ते 30 टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनर मिळू शकतो. 70 टक्के रुग्णांमध्ये रक्तगटाच्या अभावी उपचार होऊ शकत नाही. अशावेळी त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT