Latest

पाकिस्तानात मतदानावेळी दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट; सात पोलिसांसह १६ ठार

दिनेश चोरगे

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात गुरुवारी नॅशनल असेंब्लीसाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांनी लज्जा येथे मतदान केंद्राजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यात सात पोलिसांचा मृत्यू झाला. याखेरीज अन्यत्र विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात दोन बालकांसह नऊजण ठार झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटवरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तथापि, त्यामुळे लोक आणखी प्रक्षुब्ध झाले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातूनच टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाच्या पूर्वसंध्येला बुधवारी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोट आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू झाले. जवळपास प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंजाब प्रांतात मतदानावेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. पंजाब प्रांतात मतदान प्रतिनिधींना अटक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीत घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केले. यात लज्जा गावात किमान सात पोलिसांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून टपालाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना मात्र मतदान करता आले नाही.

मोर्चेकर्‍यांविरुद्ध अश्रुधुराचा वापर

पोलिसांनी निवडणूकपूर्व मोर्चे काढण्यास काही राजकीय पक्षांवर बंदी घातली आहे. तरीसुद्धा हा आदेश धाब्यावर बसवून काढण्यात आलेल्या मोर्चांवर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. इम्रान खान यांच्या समर्थकांनी कराचीमध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला. त्यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ पक्षाने मतदान शांततेत आणि सुरळीत होण्यासाठी सिंध प्रांतातील राज्यपालांना हटविण्याची मागणी केली.
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचा मुलगा हाफिज तलहा सईद हाही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. पाकिस्तानच्या संसदेत प्रवेश करण्याचा दहशतवाद्यांचा मानस असल्याचे यातून उघड झाले
आहेत.

नवाज शरीफ यांचे पारडे जड

नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन या पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. शरीफ यांना लष्कराचीही पाठिंबा आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असल्याने शरीफ यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT