कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Temperature : गेल्या चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अहवालानुसार रविवारी किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. दैनंदिन तापमानाच्या तुलनेत पारा दोन अंशांनी घसरल्याने शहरासह संपूर्ण जिल्हा गारठला. 2020 नंतर नोव्हेंबर महिन्यात प्रथमच पारा 15 अंशापर्यंत खाली आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी 19 ते 20 अंशापर्यंत असणारे किमान तापमान अचानक घटल्याने पहाटे आणि सायंकाळनंतर कमालीचा गारठा जाणवू लागला आहे. दिवसभर निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाश असतानाही बोचर्या वार्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत होती. सायंकाळनंतर थंडीचा कडाका वाढू लागला. रात्री तर हुडहुडी भरावी इतकी थंडी होती.
थंडीची तीव्रता वाढू लागल्याने बहुतांशी नागरिक उबदार कपड्यांसह घराबाहेर पडल्याचे चित्र सर्वत्र होते. स्वेटरसह कानटोपी आणि हातमोजे घातलेल्या नागरिकांची संख्या अनेक दिवसांनंतर आज अधिक दिसत होती. पहाटे आणि सायंकाळनंतर थंडीचा प्रभाव जास्त असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहे.
Temperature : ग्रामीण भागात हुडहुडी
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांसह डोंगराळ भागात थंडीचा जोर अधिक वाढला आहे. ग्रामीण भागात दुपारी चारनंतर थंडी सुरू होते ते सकाळी 10 पर्यंत थंडीचा कडाका कायम असतो.
Temperature : दहा वर्षांत चार वेळा पारा 15 च्या खाली
नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळतो. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षांत नोव्हेंबर महिन्यात केवळ चार वेळा तापमान 15 अंशापर्यंत खाली आले होते. 24 नोव्हेंबर 2007 रोजी कोल्हापुरात नीचांकी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
Temperature : महाबळेश्वरचा पारा घसरला
महाबळेश्वर : वेण्णा लेक परिसराचा पारा 6 अंशावर आला असून शहरात किमान 10.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.