Latest

कंबोडियातील मंदिर ठरले आठवे आश्चर्य

Arun Patil

आजपर्यंत जगात प्राचीन सात आणि अर्वाचिन सात आश्चर्ये आहेत. आता नुकतीच कंबोडियात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या अंग्कोरवाट मंदिराला आठवे आश्चर्य म्हणून मान्यता मिळालेली आहे… हे मंदिर भगवान विष्णूचे आहे.

भारताच्या समृद्ध वैभवशाली इतिहासात मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आजही जगभरात अनेक देशांमध्ये पसरलेली आहे. भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक कथा आजही जगभरात पाहायला मिळतात. जगभरातील मंदिरांच्या माध्यमातून ते प्रतीत होते. प्राचीन काळापासून अनेक मंदिरांची निर्मिती होत आलेली आहे; पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगातील सर्वात मोठे मंदिर हे कंबोडिया देशात आहे. इटलीतील ज्वालामुखी शहर पॉम्पेईला मागे टाकून कंबोडियातील अंग्कोरवाट हे जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. अंग्कोरवाट येथील भव्यतम मंदिराची शिल्पकला जगात अद्वितीय आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.

अंग्कोरवाट हे भगवान विष्णूचे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास 800 वर्षांहून अधिक प्राचीन आहे. कंबोडियातील अंग्कोरवाट मंदिराची एक-एक वास्तुकला आश्चर्यात टाकणारी आहे. अंग्कोरवाट मंदिर 12 व्या शतकात राजा (द्वितीय) सूर्यवर्मन याने 30 वर्षांच्या कालावधीत निर्माण केल्याचे म्हटले जाते. 'युनेस्को'ने 1992 मध्ये जागतिक वारसास्थळांच्या यादीत याचा समावेश केलेला आहे आणि आता ते जगातले आठवे आश्चर्य ठरलेले आहे. कंबोडिया एकेकाळी 'कंपुचिया' म्हणून ओळखले जात होते आणि ते सामर्थ्यशाली हिंदू आणि बौद्ध साम्राज्यांसाठी ओळखले जात होते.

अंग्कोरथोम आणि अंग्कोरवाट या प्राचीन कंबुज देशाच्या राजधानी होत्या. असे मानले जाते की, या राज्याचा संस्थापक कौंडिण्य ब्राह्मण होता, त्याचे नाव तेथील संस्कृत शिलालेखामध्ये आढळते. 9 व्या शतकात, (तृतीय) जयवर्मन हा कंबुजचा राजा झाला आणि त्याने इ. स. सुमारे 860 मध्ये अंकोर्थम नावाची राजधानी सुरू केली. तिला वसवण्यासाठी 40 वर्षे लागली. इ.स. 900 च्या सुमारास ती पूर्ण झाली. कंबुज साहित्यातही त्याच्या बांधकामाबाबत अनेक प्रसंग आढळतात. थोम याचा अर्थ राजधानी असा होय. या मंदिरांच्या शिल्पांवर भारतीय गुप्तांच्या कलेचा प्रभाव असल्याचे दिसते.

अंग्कोरवाट मंदिरात, तोरण आणि शिखरे यांची सजावट गुप्त घराण्याच्या कलांचे दर्शन घडवते. मंदिरातील एका शिलालेखावरून असे दिसून आले आहे की, यशोधरपूरचा संस्थापक राजा यशोवर्मा हा विद्वान, हस्तकला, भाषा, लिपी आणि नृत्यात निपुण होता. अंग्कोरथोमव्यतिरिक्त, त्याने कंबुज राज्यातील अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले, जेथे रामायण, महाभारत, पुराण आणि इतर भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास शिकवला गेला. अंग्कोरवाटच्या हिंदू मंदिरावर नंतर बौद्ध धर्माचा खोलवर प्रभाव पडला आणि नंतर तेथे बौद्ध भिख्खूंनी वास्तव्य केले असल्याचे म्हटले जाते.

अंग्कोरवाट हे 162.6 हेक्टर जागेत पसरलेले आहे. अंग्कोरचे जुने नाव 'यशोधरपूर' होते. हे सम्राट सूर्यवर्मन (द्वितीय) याने (1112-53) च्या काळात बांधले होते. मेकाँग नदीच्या काठावर सिम्रीप शहरात हे मंदिर असून, जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. अंग्कोरवाटचे मध्यवर्ती संकुल तीन मजली आहे. येथे मंदिराच्या मध्यभागी एक 65 मीटर उंच टॉवर आहे, तो चार लहान टॉवर्सनी वेढलेला आहे. या मंदिरात वाळूच्या दगडापासून बनवलेली भगवान विष्णूची 3.2 मीटर उंचीची मूर्तीही आहे. अंग्कोरवाट हे 2 किलोमीटर परिसरात पसरलेले असून, लांबी 700 फूट आहे. या मंदिराच्या बाहेर विशाल खोल दरी आहे आणि पार करण्यासाठी पूल आहे. मंदिर परिसरात पाच कमळाच्या आकाराचे टॉवर आहेत, जे मेरू पर्वताचे प्रतीक आहेत. किंबहुना, मंदिराची सुंदर वास्तुकला हे जगातील आठवे आश्चर्य बनवते. कंबोडियाचे हे मंदिर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेदेखील जगातील सर्वात मोठी धार्मिक संरचना मानली आहे.

खमेर शास्त्रीय स्थापत्य शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो. हे मंदिर सूर्यवर्मन (द्वितीय) याचा उत्तराधिकारी धरणीन्द्र वर्मनने पूर्ण केले होते. इजिप्त व मेक्सिकोच्या स्टेप पिरॅमिडप्रमाणे पायर्‍या किंवा सिडीप्रमाणे बांधकाम असून, मूळ शिखर जवळपास 64 मीटर उंच आहे. इतर आठ शिखर 54 मीटर उंच आहेत. स्थानिक लोकांमध्ये या मंदिराबद्दल खूप आदर आहे, त्यामुळे या मंदिराला कंबोडियाच्या राष्ट्रध्वजातही स्थान देण्यात आले आहे.

विद्वानांच्या मते, ते चोल वंशाच्या मंदिरांसारखे आहे. या मंदिरात दक्षिण-पश्चिमेला तीन गॅलरी आहेत, आतील गॅलरी जास्त उंचीवर आहेत. मंदिराच्या भिंतीवर भारतीय हिंदू धार्मिक ग्रंथातील अनेक प्रसंग, द़ृश्ये दर्शवण्यात आली आहेत. अप्सरांचे अतिशय सुंदर चित्रण करण्यात आले आहे, दानव आणि देव यांच्यातील समुद्रमंथनाचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. मंदिराच्या कॉरिडोरमध्ये तत्कालीन सम्राट, बळी-वामन, स्वर्ग-नरक, समुद्रमंथन, देव-दानव युद्ध, महाभारत, हरिवंश पुराण आणि रामायण यांच्याशी संबंधित अनेक दगडी चित्रे आहेत.

इथल्या रॉक पेंटिंगमध्ये चित्रित केलेली राम कथा अगदी थोडक्यात आहे. या रॉक पेंटिंगची मालिका रावणाच्या वधासाठी देवतांनी केलेल्या पूजेपासून सुरू होते. त्यानंतर माता सीता स्वयंवराचे द़ृश्य कोरण्यात आला आहे. दुसर्‍या एका रॉक पेंटिंगमध्ये प्रभू राम धनुष्यबाण घेऊन हरणामागे धावताना दिसतात. यानंतर प्रभू राम यांची सुग्रीवाशी मैत्री झाल्याचे द़ृश्य आहे. त्यानंतर बळी आणि सुग्रीव यांच्यातील द्वंद्व चित्रण केले आहे. आणखी एका रॉक पेंटिंगमध्ये अशोक वाटिकेत हनुमानाची उपस्थिती, राम-रावण युद्ध, माता सीतेची अग्निपरीक्षा आणि प्रभू रामाचे अयोध्येत परतले या द़ृश्यांचे चित्रण दाखवण्यात आले आहे. नंतर अंग्कोेरवाटच्या मंदिरावर बौद्ध धर्माचा प्रभाव पडला. त्यात बौद्ध भिख्खू राहत असत, असे म्हटले जाते.

हे मंदिर बराच काळ अज्ञात राहिले. फ्रेंच पुरातत्त्व शास्त्रज्ञ हेन्री महाऊत यांच्यामुळे 19 व्या शतकाच्या मध्यात अंग्कोरवाट मंदिर पुन्हा प्रकाशझोतात आले. 1986 ते 1993 या काळात भारतीय पुरात त्त्व सर्वेक्षण विभागाने या मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. पर्यटक येथे केवळ वास्तुशास्त्राचे अनोखे सौंदर्य पाहण्यासाठीच येत नाहीत, तर येथील सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही येथे येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT