हैदराबाद ; पुढारी ऑनलाईन तेलंगणा सरकार आजपासून म्हणजेच ९ डिसेंबरपासून राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून महिलांसाठी मोफत प्रवासाचे दिलेले वचन पूर्ण करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. काँग्रेस सरकाने गुरूवारी आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ डिसेंबरपासून महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि 'राजीव आरोग्यश्री' स्वास्थ्य योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 'राजीव आरोग्यश्री' च्या माध्यमातून १० लाख रूपयांची वीमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तेलंगाणात कोठेही मोफत प्रवास
विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान काँग्रेसने ६ वचने दिली होती. त्या आधारे तेलंगाणा सरकारने महालक्ष्मी योजना सुरू केली आहे. ज्याव्दारे तेलंगाणा निवासी सर्व वयोगटातील मुली आणि महिला तसेच ट्रांसजेंडर व्यक्ती तेलंगाणा राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवास करू शकतील. त्यानुसार ९ डिसेंबर दुपारपासून ग्रामीण सेवा आणि एक्स्प्रेस बसेसमधून तेलंगाणा राज्याच्या सीमेत प्रवास करू शकतात.
महिला प्रवाशांचे भाडे सरकार देणार
महिला प्रवाशांचे भाडे राज्य सरकार तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (TSRTC) देईल, असे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे. टीएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही सी सज्जनार म्हणाले की, या योजनेची औपचारिक सुरूवात 9 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता राज्य विधिमंडळ संकुलातून केली जाईल. या कार्यक्रमाला मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी आणि प्रसिद्ध बॉक्सर निखत जरीन उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रेड्डी यांनी मुख्यमंत्री होताच दोन फाईल्सवर सह्या केल्या
उल्लेखनीय आहे की, 7 डिसेंबर रोजी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी दोन फायलींवर स्वाक्षरी केली. त्यापैकी एक काँग्रेसच्या सहा निवडणुकीच्या 'हमींच्या' अंमलबजावणीशी संबंधित आहे आणि दुसरी फाईल पूर्वी रेवंत रेड्डी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार अपंग महिलेला नोकरी देण्याशी संबंधित आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) नेतृत्त्वाने दोन दिवसांपूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून रेवंत रेड्डी यांचे नाव दिले होते. 119 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 64 जागा जिंकून भारत राष्ट्र समिती (BRS) कडून सत्ता हिसकावून घेतली.
हेही वाचा :