पुणे; पुढारी वृत्तसेवा : बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठीच्या तंत्रज्ञानाचे संशोधन भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) मदतीने करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानात नॅनो डायमंड हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून, तो पुण्यातील प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य अमर्याद वाढून अनेक पिढ्यांपर्यंत वापरणे शक्य होईल व त्यानंतर बॅटरीचा पुनर्वापर करणे शक्य होणार असल्याची माहिती डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डाएट) चे कुलगुरू डॉ. रामनारायणन यांनी दिली .
देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या डाएटचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी डाएटमध्ये सुरू असलेल्या संशोधनाबाबत पत्रकारांना माहिती दिली. बॅटरी, संवाद प्रणाली, रडार, क्वांटम तंत्रज्ञान, ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेल्या या संशोधनांचे सादरीकरण सोमवारी (15 मे) होणार्या पदवीप्रदान कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. मागील काही वर्षांत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
त्यामुळे ड्रोनद्वारे हल्लेही केले जातात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ड्रोन नष्ट करण्यासाठी सॉफ्ट स्किल हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक बंदुकीच्या साहाय्याने ड्रोन पाडले जाते. त्याशिवाय हेलिकॉप्टरसह आकाशात उडणारी वस्तू शोधण्यासाठी फोटोनिक रडार विकसित करण्यात आले आहे. जीपीएस डिनाईड नेव्हिगेशन सिस्टिम अर्थात जीपीएस प्रणाली बंद ठेवूनही अचूकतेने हवे असलेले ठिकाण शोधता येणारी प्रणाली तयार करण्यात आली आहे.
समुद्रातील पाणबुडीशी आकाशातून संपर्क साधण्यासाठीची प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. सध्या प्रयोगशाळेत कमी क्षमतेची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीची क्षमता आवश्यकतेनुसार वाढवणे शक्य आहे. सध्या पाणबुडीशी आकाशातून संपर्क साधण्याची प्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे अमेरिका, चीन असे देश त्यासाठीचे संशोधन करत आहेत. आता त्या देशांच्या यादीत भारतही येऊन बसला असल्याचे डॉ. रामनारायणन यांनी सांगितले.