पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, विश्लेषणातून अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कुरुलकर सप्टेंबर 2022 मध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना मोहजालात (Hony Trap) अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल संच जप्त करण्यात आला होता. कुरुलकर यांच्या कडून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, तसेच मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे; तसेच गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड अनॅलिसिस विंग- रॉ) चौकशी सुरू झाली आहे.