Latest

INDvsSL T20 : भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

रणजित गायकवाड

लखनऊ : पुढारी वृत्तसेवा

भारताने पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला असून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा हा सलग 10वा विजय आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 199 धावा केल्या. इशान किशनने (89) सर्वाधिक धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 57 धावांची नाबाद खेळी खेळली. कर्णधार रोहित शर्माने 44 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 137 धावाच करू शकला. चरित अस्लंकाने सर्वाधिक 53 (नाबाद) धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला (0) बोल्ड केले. तिसऱ्या षटकात भुवीने कामिल (१३)च्या खेळीला ब्रेक लावला. वेंकटेश अय्यरने जेनिथ लियानेजला (11) बाद करून भारतीय संघाला तिसरे यश मिळवून दिले. संजू सॅमसनने झेनिथचा झेल टिपला. अनुभवी खेळाडू दिनेश चंडिमल (10) यालाही मोठी खेळी खेळता आली नाही. रवींद्र जडेजाने चंडीमलला इशान किशनच्या हाती यष्टिचित केले. युझवेंद्र चहलने कर्णधार दासून शनाकाची (3) विकेट घेतली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 71 चेंडूत 111 धावांची भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी लाहिरू कुमाराने रोहितला (44) बाद करून फोडली. यानंतर ईशानने दुसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसोबत 31 चेंडूत 44 धावांची भागीदारी केली.

T20I मधील पहिल्या शतकाच्या वाटेवर असलेला इशान किशन दासुन शनाकाच्या चेंडूवर 89 धावांवर बाद झाला. श्रेयस आणि रवींद्र जडेजाने तिसऱ्या विकेटसाठी 18 चेंडूत नाबाद 44 धावा जोडल्या. श्रेयस अय्यरने 28 चेंडूत नाबाद 57 तर जडेजाने 4 चेंडूत नाबाद 3 धावा केल्या.

रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज..

आपल्या डावातील ३७ व्या धावांसह रोहित शर्मा टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला (३२९९) मागे टाकले. या सामन्यापूर्वी रोहित हा गुप्टिल आणि विराट कोहली (३२९६) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होता. आता तो नंबर-१ बनला आहे.

भारतीय संघ असा :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल

श्रीलंकेचा संघ असा :

पाथुम निसांका, कामिल मिश्रा, चरित असलंका, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, जेफ्री वेंडरसे, प्रवीण जयविक्रम, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT