पुढारी ऑनलाईन डेस्क : सेंच्युरियनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून सर्वांना मोठ्या आशा होत्या. कदाचित कोहलीची बॅट शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणेल आणि तो मोठी इनिंग खेळेल. पण तसे झाले नाही आणि पहिल्या डावात ३५ धावा आणि दुसऱ्या डावात १८ धावा अशा माफक धावसंख्येवर कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या विकेटने चाहत्यांची निराशा झाली. केवळ विराटच नाही तर पुजारा आणि रहाणेलाही फलंदाजीत फारसे योगदान देता आले नाही. (Virat Kohli Flop)
रन मशीनच्या नावाने जागतिक क्रिकेटमध्ये ठसा उमटवणाऱ्या विराट कोहलीची (Virat Kohli Flop) बॅट धावांच्या दुष्काळाशी झुंज देत आहे. कोहलीच्या बॅटने कोणत्याही फॉरमॅटमध्ये मोठी खेळी करून बराच काळ लोटला आहे. सेंच्युरियन कसोटीत विराटने आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करावी आणि संघाच्या धावसंख्येमध्ये मोठे योगदान द्यावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने पुन्हा एकदा सर्वांची निराशा झाली आणि विराटने स्वस्तात विकेट गमावली.
कोहलीने गेल्या ६० डाव आणि ७६८ दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही आणि २०२१ मध्ये विराटने ११ कसोटी सामन्यांमध्ये २८.२१ च्या सरासरीने एकूण ५३६ धावा केल्या. बर्याच काळापासून विराट कोहली आपल्या चुकांमधून शिकण्याऐवजी त्याची पुनरावृत्ती करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विराटने १० व्या यष्टीवर असणारा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला. आणि विकेट गमावली. तर दुसऱ्या डावात त्याने ८ व्या स्टंपचा चेंडू ड्राईव्ह करायच्या नादात स्वत:चा बळी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केला. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात ३५ आणि दुस-या डावात १८ धावांवर तो बाद झाला. (Virat Kohli Flop)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, विराट कोहली गेल्या ३ वर्षांत ११ ड्राईव्ह करताना बाद झाला आहे. कसोटीच्या फॉर्मेटमध्ये पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने बाद होणे ही खरोखरच चिंतेची बाब आहे. कोहलीने ही चूक सुधारली नाही, तर त्याच्या बॅटमधून 'विराट' खेळीला चाहत्यांना मुकावे लागेल अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.
द. आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, विराट हा अशा मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे ज्याने जवळपास सर्व मैदानांवर धावा केल्या आहेत. आता जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर कोहलीचा विक्रम बघितला तर त्याने तिथे आतापर्यंत फक्त २ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने ३१० धावा केल्या आहेत. आता हा विक्रम पाहता वाँडरर्स स्टेडियमवर पुन्हा एकदा चाहत्यांना आणि भारतीय कॅम्पला कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.