Latest

Tattoo : टॅटूमुळे त्वचेच्या कर्करोगाचाही संभवतो धोका

Arun Patil

न्यूयॉर्क : गोंदण्याची कला जुनीच आहे. आधुनिक काळात हीच कला 'टॅटू' नावाने पुढे आली आणि जगभर अनेक लोक यामुळे अक्षरशः 'क्रेझी' झाले! अर्थात, सध्याच्या काळातील टॅटू हे पूर्वीच्या गोंदण्याइतके सुरक्षित राहिलेले नाही. याचे कारण म्हणजे टॅटूसाठी वापरल्या जाणार्‍या असुरक्षित सुई तसेच त्यामधील शाई. त्यामुळे योग्य काळजी घेणार्‍या व्यावसायिक टॅटू आर्टिस्टकडूनच टॅटू काढून घेणे हितावह असते. आता तर याबाबतच्या ए का नव्या संशोधनात आढळले की, टॅटूच्या 54 प्रकारच्या शाईच्या नमुन्यांपैकी 90 टक्के नमुन्यांमध्ये आरोग्यासाठी हानीकारक रसायनांचा वापर होतो. त्यामध्ये 'पॉलिइथिलिन ग्लायकॉल' आणि '2-फेनॉक्सीथेनॉल'सारख्या रसायनांचा समावेश आहे. अशा रसायनांमुळे त्वचेच्या कर्करोगाचाही धोका संभवतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

याबाबतच्या संशोधनाची माहिती 'अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार टॅटूच्या शाईतील रसायनांमुळे रोगप्रतिकारक शक्ती तसेच शरीराच्या विविध अवयवांनाही धोका संभवतो. अमेरिकेत याबाबतचे संशोधन झाले आहे. 'पॉलिइथिलिन ग्लायकॉल' हे रसायन किडनी नेक्रॉसिससह विविध अवयवांची हानी करू शकते. तसेच '2-फेनॉक्सीथेनॉल' हे शरीराच्या चेतासंस्थेला प्रभावित करते. या संशोधनाचे प्रमुख डॉ. जॉन स्वर्क यांनी सांगितले की, टॅटूची शाई बनवणार्‍या कंपन्या या रसायनांचा वापर आपले उत्पादन सरस बनवण्यासाठी करीत असतात.

डॉक्टरांनीही याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. टॅटू बनवण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे. त्यामध्ये शाईचा दर्जा आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम तपासून पाहणे गरजेचे आहे. टॅटू बनवण्यावेळी शरीरात ही शाई सोडली जाते, जी पांढर्‍या रक्तपेशींच्या मॅक्रोफेजकडून शोषली जाते. त्यामुळे त्वचेवर ती कायमस्वरुपी राहते. मात्र, काहीवेळा शाईतील हानीकारक घटक रक्तप्रवाहातही मिसळले जातात. ते संपूर्ण शरीरात मिसळल्यावर अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स संभवतात. काहीवेळा तर काही अवयव निकामी होण्याचाही धोका असतो. आता अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) टॅटू बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शाईतील रसायनांची मॉनिटरींग सुरू करण्याचे ठरवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT