पुढारी ऑनलाईन : टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन हे भारतीय कार्पोरेट जगतामधील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) ठरले आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात वेतनापोटी ११३ कोटी रुपये मिळाले. त्यांना नफ्यावरील कमिशन म्हणून शंभर कोटी मिळाले. त्यांना 'चंद्रा' या नावाने संबोधले जाते. गत आर्थिक वर्षात त्यांना १०९ कोटी इतके वेतन मिळाले होते.
टाटा सन्सही टाटा समूहातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालात दिलेल्या माहितीनुसार कार्यकारी संचालक सौरभ अग्रवाल यांना २.८ कोटी रुपये इतके मानधन मिळाले. तर टाटा सन्सचे संचालक विजय सिंग, हरीश मनवानी, लिओ पुरी, भास्कर भट व राल्फ स्पेथ यांना प्रत्येकी २.८ कोटीचे कमिशन मिळाले. जुलै २०२२ मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त झालेल्या अनिता जॉर्ज यांना २.१ कोटी इतके मानधन मिळाले.
या आर्थिक वर्षात ३५, ०५८ कोटींचा महसूल व स्टैंडअलोन आधारावर टाटा सन्सने २२, १३२ कोटीचा नफा नोंदवला. गत आर्थिक वर्षात कंपनीने २४,१३२ कोटी रुपयांची कमाई केली आणि १७, १७१ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. उपकंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने टाटा सन्सला सर्वाधिक लाभांश दिला आहे.
इतर कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पूनावाला फिनकॉर्पचे एमडी संचालक अभय भुतडा यांना या आर्थिक वर्षात ७८. १ कोटी इतका पगार मिळाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांनी त्यांचे वेतन १५ कोटींपर्यंत मर्यादित केले. तर अदानी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष गौतम अदानी यांना २. ३९ कोटी, जेएसडब्ल्यू स्टीलचे चेअरमन सज्जन • जिंदाल यांना ५१.३ कोटी रुपये वेतन मिळाले.