तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीतील आक्षेप व दुरुस्त्यांसाठी सोमवार (दि.27) अखेरच्या दिवस अखेर 220 अर्ज तक्रारदारांनी दाखल केले आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून एकूण चौदा प्रभाग निश्चित करण्यात आलेले आहेत. या चौदा प्रभागाच्या मतदार याद्या प्रारूप स्वरूपात जाहीर करण्यात आल्या होत्या. या मतदार यादींवरील हरकती सोमवार (दि. 27) अखेरपर्यंत घेण्यात येणार होत्या. त्यानुसार नगर परिषदेकडे 220 तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज 220 असले तरी मतदारांच्या नावाच्या, राहण्याच्या ठिकाणांच्या, बदललेल्या प्रभागाच्या दुरुस्त्यांसाठी सुमारे तीन ते चार हजार नगर परिषदेस प्राप्त झाले आहेत.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अध्यक्ष निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार, तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रारुप यादीचा अभ्यास करून त्याच्या दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीमध्ये एकुण मतदार 56 हजार 825 यामध्ये पुरुष 29 हजार 372 तर स्त्रिया 27 हजार 462 आहेत. दिनांक 27 जून ते 30 तारखेपर्यंत मतदार तक्रार अर्ज छाननी होणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष तक्रारींची शहानिशा करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्यअधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली. यासाठी प्रभाग लिपिक 13, डेटाएंट्री ऑपरेटर 13 तर पाहणी करणारे 4 जणांची नेमणूक केली असून 30 जूनपर्यंत सर्व अहवाल एकत्र करून प्रसिद्धीसाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.