तळेगाव दाभाडे : रविवारचा आठवडे बाजार, नागरिकांची दिवाळी सणाकरीता खरेदीसाठी झालेली गर्दी आणि आमदार सुनील शेळके यांनी आयोजित केलेले महाआरोग्य शिबिरामुळे तळेगाव दाभाडे शहरातील मारूती मंदिर चौक, जिजामाता चौक परिसरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. यामुळे चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
तळेगाव शहरात दर रविवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात तळेगाव शहराच्या आसपाच्या गावातून नागरिक भाजीपाला, कडधान्य व अन्य गोष्टी खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजारात प्रामुख्याने भाजीपाला तर असतोस शिवाय कॅटलरी, किराणामाल, स्टेशनरी, बेकरीमाल व इतर वस्तू स्वस्त मिळत असल्यासमुळे नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते.
रविवारची अनेकांना सुटी असल्याने बाजारपेठेत दिवाळी सणाकरिताच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. बहुतेक ग्राहक स्वतःचे वाहन घेऊन आल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. या बाजारपेठ परिसरात वाहनतळ नसल्यामुळे चालक मिळेल तेथे आपले वाहन पार्क करताना दिसत होते.
तळेगाव शहरात गुरुवारपासून आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील नथुभाऊ भेगडे पाटील प्राथमिक शाळेच्या मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मारुती मंदिर चौक परिसरात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले.
अनेक वर्षांपासून तळेगाव हे ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठ राहिली आहे. या ठिकाणी होणार्या आठवड्या बाजारामध्ये ग्रामीण भागातून तसेच शहरातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यांच्या वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने इकडे तिकडे अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्यासाठी रविवारच्या बाजारादिवशी स्वतंत्र वाहनतळ निर्माण करण्याची मागणी केली जात आहे.
तळेगाव व परिसरामध्ये जाण्यासाठी लिंब फाट्यावरुन मारुती मंदिर चौकात यावे लागते. या ठिकाणी आठवडे बाजार असल्याने चालक आपल्या मनाप्रमाणे वाहने चालवित असतात. यामुळे वाहतूककोंडी होत आहे. यासाठी एकेरी वाहतूक करण्याची मागणी केली जात आहे.