Latest

T-20 World Cup : ‘हाय व्होल्टेज’ लढतीत ‘स्पार्क’ कोणाचा?

Arun Patil

भारत आणि पाकिस्तान ही लढत (T-20 World Cup) अख्ख्या क्रिकेट जगतासाठी 'हाय व्होल्टेज' लढत असते. यामध्ये जो चमकला, तो त्या देशाचा पुढे अनेक दिवस स्टार असतो. आजच्या (रविवार) लढतीत दोन्ही देशांकडून कोणते खेळाडू 'स्पार्क' दाखवू शकतात ते पाहूया…

देशवासीयांच्या अपेक्षांचा दबाव (T-20 World Cup)

पाकिस्तानी संघाची धुरा वाहणार्‍या बाबर आझमची ही पहिलीच विश्‍वचषक स्पर्धा आहे. बाबरला पाकिस्तानात विराट कोहलीची कॉपी समजली जाते. त्याने आपल्या नेतृत्वाने आणि कामगिरीने प्रभावित केले असल्याने यंदा भारताला विश्‍वचषकात हरवण्याचा 'मौका' आला आहे, असे पाकच्या जनतेला वाटते.

देशवासीयांच्या या अवास्तव अपेक्षांचे ओझे बाबरच्या डोक्यावर आहे. या टी-20 वर्ल्डकपच्या सराव सामन्यात बाबरने वेस्ट इंडीजविरुद्ध अर्धशतक करून आपण फॉर्ममध्ये असण्याचे संकेत दिले आहेत. बाबरची टी-20 मधील एकूण आकडेवारी पाहिली तर त्याने 61 सामन्यांत एकूण 2,204 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावापुढे 20 अर्धशतके आहेत. अपेक्षांचा दबाव न घेता वैयक्‍तिक कामगिरी कशी चांगली होईल याचा विचार बाबर करीत असेल.

अविस्मरणीय कामगिरीसाठी उत्सुक (T-20 World Cup)

कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही शेवटची टी-20 वर्ल्डकप स्पर्धा आहे. त्यामुळे 32 वर्षीय कर्णधार आपल्या नेतृत्वात विश्‍वविजेतेपद मिळवण्यास उत्सुक आहे. टी-20 वर्ल्डकपमधील आकडेवारी पाहिल्यास कोहलीने 16 सामने खेळले आहेत. यामध्ये 777 धावा त्याने केल्या आहेत. त्याच्या नावापुढे 9 अर्धशतकांची नोंद आहे.

क्रिकेटच्या या छोट्या आणि झटपट प्रकारात त्याचा 133 चा स्ट्राईक रेट आहे. टी-20 प्रकारातील एकूण सामन्यांची आकडेवारी पाहिली तर भारतीय कर्णधाराने 90 सामन्यांत 52.65 च्या सरासरीने 3,159 धावा केल्या आहेत. यात 28 अर्धशतकांचा समावेश आहे. 2016 मध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत जिंकला होता. तशीच अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी तो आताही उत्सुक असेल.

अनुभवाचा फायदा उठवण्यास सज्ज

विश्‍वचषकासाठी संघ निवडताना पाकिस्तानने डेडलाईनपर्यंत चार बदल केले. यात सोहेब मक्सूद हा दुखापतीमुळे खेळू शकणार नाही म्हणून शेवटच्या क्षणी संघात निवड झालेला 39 वर्षीय शोएब मलिक हा पाकिस्तान संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये शोएबने 28 सामने खेळले असून, 546 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 अर्धशतके केली आहेत.

याशिवाय त्याने एकूण 116 सामन्यांत 8 अर्धशतकांसह 2,335 धावा केल्या आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात किती दबाव असतो, याची शोएबला चांगली जाण आहे. यातून बाहेर येत सामन्यावर कसे लक्ष केंद्रित करायचे, याचे मार्गदर्शन तो संघातील नवोदित खेळाडूंना करू शकतो. मधल्या फळीतील सामन्याची गरज ओळखून खेळणारा आश्‍वासक फलंदाज आणि फिरकी गोलंदाज असल्यामुळे त्याच्या समावेशाने संघात समतोल साधला जात आहे.

भारतासाठीचा खलनायक

पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान याला भारताविरुद्ध धावा करायला नेहमीच आवडते. तो हाच खेळाडू आहे की, ज्याने 2007 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक करून भारताचा विजय हिरावून घेतला होता. विशेष म्हणजे डावाच्या सुरुवातीलाच त्याचा त्रिफळा उडाला होता. परंतु; भारताच्या जसप्रीत बुमराहचा पाय क्रीझच्या बाहेर पडल्यामुळे तो नोबॉल ठरला, याचा फायदा फखरने चांगलाच उठवला आणि शतकी खेळी केली.

पाकिस्तानला चॅम्पियन बनविण्यात फखरचा मोठा वाटा होता. या खेळीमुळे त्यांच्या देशात हीरो बनलेला फखरचा फॉर्म मात्र नंतर ढेपाळला. त्यामुळे त्याला संघातील स्थानही गमवावे लागले होते. परंतु, तो आता वर्ल्डकपसाठी पुन्हा संघात आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली असली तरी हा त्याचा पहिलाच वर्ल्डकप आहे. या डावखुर्‍या सलामीवीराने 53 टी-20 सामन्यांत 1,021 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 अर्धशतकेही केली आहेत. टी-20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 136 इतका आहे.

फक्‍त सेट होण्याची गरज

क्रिकेट विश्‍वात 'हिटमॅन' नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला रंगीत कपड्यातील क्रिकेट खेळणे जास्त पसंत आहे. 34 वर्षीय रोहित 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळलेला आणि आताच्या संघात असलेला एकमेव भारतीय आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने 28 सामने खेळले आहेत. यात त्याने 127.22 च्या स्ट्राईक रेटने 673 धावा केल्या आहेत. टी-20 मधील एकूण कामगिरीचा आढावा घेता 111 सामन्यांत त्याने 2,864 धावा केल्या आहेत. यात 4 शतके आणि 22 अर्धशतके आहेत.

त्याचा स्ट्राईक रेट 139 इतका आहे. सुरुवातीला संथ खेळणारा रोहित एकदा सेट झाला की, त्याला आवरणे कोणत्याही संघाला अवघड असते. क्रिकेटमधील सगळे फटके त्याच्या भात्यात आहेत. विशेषत: त्याने मारलेला पूलचा फटका बॅटमधून निघाला असला तरी आवाज मात्र गोलंदाजाच्या कानाखाली निघालेला असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात रोहितने आक्रमक अर्धशतक खेळी केली आहे. पाकिस्तानला विराटपेक्षा रोहितच्या बॅटिंगचीच जास्त भीती वाटत असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा कलंक पुसण्याची संधी

2007 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतकवीर फखर झमानचा त्रिफळा उडाला होता. परंतु; तो नोबॉल ठरला आणि सामना भारत हरला. या पराभवाचा कलंक जसप्रीत बुमराहच्या कपाळावर कायमचा लागला. हा कलंक अश्‍वत्थाम्याच्या जखमेसारखा अजूनही त्याच्या मनात भळभळतो आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर भारताला पाकिस्तानवर विजय मिळवून देत हा कलंक पुसण्याची बुमराहला संधी आहे.

बुमराह हा 'यॉर्कर किंग' म्हणून ओळखला जातो आणि टी-20 मध्ये 'डेथ ओव्हर'मध्ये किफायती गोलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे. बुमराहची शेवटची दोन षटके नेहमी निर्णायक ठरतात. या 12 चेंडूंत त्याने अनेक सामने फिरवले आहेत. आपला पहिलाच टी-20 वर्ल्डकप खेळणार्‍या बुमराहने 50 सामन्यांत 59 विकेटस् घेतल्या आहेत. 11 धावांत 3 विकेटस् ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

वर्ल्डकप
हेड-टू-हेड
सामने – 12
भारत – 12
पाकिस्तान – 00
वन-डे वर्ल्डकप
सामने – 7
भारत – 7
पाकिस्तान – 0
टी-20 वर्ल्डकप
सामने – 5
भारत – 5
पाकिस्तान – 0

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT