टी २० वर्ल्डकप ( T20 World Cup ) मधील भारताची सुरुवातच पाकिस्तानकडून मार खाऊन झाली. त्यानंतर सुतकी वातावरणातच त्यांनी न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळला आणि तोही सामना आठ विकेट्सनी गमावला. आता भारताची टी २० वर्ल्डकपमधून सुपर १२ मधूनच घरवापसी जवळपास निश्चित झाली आहे. काही जर तर वाली मंडळी अजून टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचवण्याची गणिते मांडत आहेत. मात्र क्रिकेट जगतातील सर्वात स्ट्राँग टीम जर तरवर अवलंबून राहणे यासारखी शोकांतिका नाही.
टी २० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारत वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार होता. त्यात आयपीएलने त्यांचा युएईमध्येच कसून सराव करुन घेतला होता. यंदाच्या टी २० वर्ल्डकपचा आयोजकही भारतच आहे. या सगळ्यात ज्या ग्रुपमध्ये भारत आहे तो ग्रुप तुलनेने फारच सोपा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये भारताला फक्त दोन सामने सांभाळून खेळायचे होते. मात्र या दोन सामन्यातच भारताचा एतर्फी पराभव झाला.
भारतासारखा टी २० क्रिकेट कोळून प्यायलेला संघ पहिल्या दोन सामन्यातच स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभा असणे म्हणजे संघात नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली आहे हे नक्की. जर भारताच्या टी २० वर्ल्डकपमधील पराभवाची कारणमिमांसा करायला गेलो तर या पराभवाची पाच प्रमुख कारणे समोर येत आहे.
भारतीय संघाची टी २० वर्ल्डकपसाठी घोषणा झाली त्यावेळी संघ निवडीवरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले गेले होते. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या या फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना संघात घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या.
आयपीएल झाल्यानंतर टीम इंडियाने आपल्या संघात बदल केला. तोही डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला स्टँडबायमध्ये ठेवून स्टाँडबायमधील शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले. त्याच्याकडे हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले गेले. मात्र हार्दिककडे जी सामना फिनिश करण्याची क्षमता आहे ती शार्दुलकडे अजून नाही. तो कसोटी जास्तीत जास्त एकदिवसीय सामन्यात हार्दिकची रिप्लेसमेंट असू शकतो. मात्र टी २० क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत तरी हार्दिकला रिप्लेसमेंट मिळालेली नाही.
त्यातच तो गोलंदाजी करत नव्हता. रोहित शर्माने सराव सामन्यावेळी हाच मुद्दा घेऊन भारताला सहाव्या गोलंदाजांचा शोध घ्यायला हावा असे मत व्यक्त केले. त्याने सराव सामन्यात विराट कोहलीकडून काही षटके टाकून घेतली. हा मुद्दा वरकरणी कॅज्युअल वाटला तरी इथेच टीम इंडियाचा प्लेईंग कॉम्बिनेशन अजून सेटच नाही हे सुचित झाले.
पहिल्या सामन्यात जो संघ खेळला त्यात दुसऱ्या सामन्यात मोठे बदल करून सलामी जोडी डिस्टर्ब करण्यात आली. रोहित शर्मा ऐवजी इशान किशनला सलामीला पाठवले. डोक्यात होते की एकदा का यांनी फायरी स्टार्ट करुन दिला की पुढच्या येणाऱ्या फलंदाजांचे काम सोपे होईल. मात्र इथे कर्णधार आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंनी खेळपट्टीचा अंदाज बांधण्यात चूक केली.
विकेट थोडी संथ असल्याने चेंडू अडकून येत होता. त्यावेळी लगेच आपल्या आक्रमक रणनितीत बदल करुन आधी खेळपट्टीवर जम वसवून नंतर गॅपमध्ये आक्रमक फटके खेळणे गरजेचे होते. परंतु टीम इंडियाच्या येणाऱ्या प्रत्येकाने हाणामारी करण्याच्या नादात आपली विकेट फेकली. त्यामुळे भारत मुश्किलीने शंभरी पार करु शकला.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजांनी गोलंदाजांसमोर १२० चेंडूत ११० धावा डिफेंड करण्यासाठी ठेवल्या तर सामना कसा जिंकणार? या आयत्यावेळेच्या अॅडजेस्टमेंट या कर्णधार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मैदानात करायच्या असतात. जर खेळपट्टीचा अंदाज घेण्यात ही मंडळी चुकली की बाहेर बसणारा मेंटॉर तरी काय करणार आहे?
वर्ल्डकमध्ये भारत पाकिस्तानकडून कधीही पराभूत झाला नव्हता. भारत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून कधीच हारणार नाही असे नव्हते. शेवटी टी २० वर्ल्डकप ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाकिस्तानने त्यांच्या कडू इतिहासाचे पान पलटले. भारताचा पराभव झाला, तोही १० विकेट्सनी हा पराभव दारुन झाला होता. त्यांच्या सलामी जोडीने भारताचे १५१ धावांचे आव्हान सहज पार केले.
हा पराभव टीम इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागला. वर्ल्डकपमधील पाकिस्तानकडून हारणारा भारताचा हा पहिला संघ. अशी इतिहासात नोदं झाल्यानंतर टीम इंडियातील खेळडूंची बॉडी लँग्वेज बदललेली दिसली. ते दबावात असल्याचे जाणवत होते. त्यातच मोक्याच्या क्षणी सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू हार्दिक पांड्या देखील दुखापत, गोलंदजी न करता येण्याचे दडपण, त्यावरुन होणारी टीका, फलंदाजीतला हरवलेला चार्म यामुळे तणावात दिसत होता.
पांड्या साखीच बॉडी लँग्वेज ही इतर खेळाडूंचीही दिसत होती. त्यांच्या मैदानातील वावरातून पाकिस्ताकडून मात खालल्याची सल प्रकर्षाने जाणवत होती.
टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी काही दिवस आधी विराट कोहलीने आपण टी २० वर्ल्डकपमधील आपले कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. मात्र त्याने आपले कर्णधारपद त्वरित सोडले नाही. तो टी २० वर्ल्डकप खेळून आपले कर्णधारपद सोडणार होता. त्याने आरसीबीचीही काही दिवसातच कॅप्टन्सी सोडली.
विराटने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कर्णधारपद सोडले असे वरकरणी सांगितले असले तरी संघातील काही खेळाडूंबरोबर त्याचे असलेले वाद आणि त्याची नेतृत्वाची पद्धत ही त्याच्या राजीनाम्याची दोन कारणे असल्याचे बोलले जाते.
अशा मानसिकतेत विराट कोहलीला टी २० वर्ल्डकमध्ये संघाचे नेतृत्व करु देणे हा एक मोठा जुगार होता. तुमचा कर्णधारच नेतृत्व करण्याच्या मानसिकतेत नसेल. संघात त्याच्या नेतृत्व शैलीवरुन वाद होत असतील. जो काही महिन्यातच कर्णधारपद सोडणार आहे. अशा मानसिकतेतील खेळाडूला तुम्ही वर्ल्डकपमध्ये नेतृत्वाची कमान देता मग याचा परिणाम निकालावर तर होणारच!
अनेक संघ वर्ल्डकपपूर्वी नेतृत्व, संघाचे कॉम्बिनेशन या सर्व गोष्टी सोडवून घेतात. आपण, ज्या कर्णधाराबद्दल काही मुद्दे उपस्थित झाले आहेत त्या मुद्यावरून तो नेतृत्व सोडणार आहे त्याला वर्ल्डकमध्ये नेतृत्व करण्याची मुभा दिली. जर नेताच डळमळीत असेल तर मग सेना कशी खंबीर राहणार?
भारतीय संघ ज्यावेळी टी २० वर्ल्डकपच्या बायोबबलमध्ये दाखल झाला त्यावेळी त्याच्या पाठीवर मावळते नेतृत्व, त्याला मदतीची गरज असल्याने मेंटॉरची झालेली नियुक्ती या सर्व नकारात्मक बाबींचे ओझे होते. त्यात दुबईतील सामना म्हणजे टॉस जितो मॅच जितो अशा धाटणीचा असतो अशी मागची आकडेवारी सांगते.
विराट कोहली आणि टॉस याचे वावडे असल्याचे आपल्याला माहित आहे. तरीही विराट सेनेची झुंजार वृत्ती पाहता टॉस हा मुद्दा इतका मानगुटीवर बसेल असे वाटेत नव्हते. त्यात पाकिस्तानविरुद्धचा टॉस आणि सामना दोन्ही भारताने गमावला. या पराभवानंतर संघाची बॉडी लँग्वेज पार बदलून गेली. या पराभवातून संघ बाहेर पडलाच नाही.
ही पराभूत मानसिकता बदलण्यासाठी टीम इंडियाकडे चांगले सहा सात दिवस होते. मात्र तरीही न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टॉस हारल्यानंतर संघाची बॉडी लँग्वेज एकदम पडली. संपूर्ण सामन्यात झुंजार विराटसेना दिसलीच नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, इशान किशन, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या हे सामन्याचे पारडे एकहाती वळवण्यात हातखंडा असलेल्या खेळाडूंमध्ये यांच्यात किलिंग इन्स्टिंग दिसलीच नाही.