मेलबर्न वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियात झालेल्या आठव्या टी-20 विश्वचषक 2022 क्रिकेट स्पर्धेत (T20 World Cup 2022) इंग्लंडने पाकिस्तानला हरवून विश्वविजेतेपद पटकावले. मेलबर्न क्रिकेट मैदानात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेटस् आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला. पाकिस्तानने 137 धावा केल्या; परंतु याचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करण्यास भाग पाडले.
पाकिस्तानने इंग्लंडला 138 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, पाकिस्तानी गोलंदाजांनी बाजू सावरून धरत इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यापासून सुरुवातीपासूनच रोखून धरले होते. मात्र, मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला गरज असताना ऐनवेळी शाहिन शाह आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि इंग्लंडला मोठी संधी मिळाली. पाकस्तानचा फिरकीपटू शादाब खानने हॅरी ब्रूकला टाकलेला चेंडू झेलून शाहिन शाह आफ्रिदीने ब्रूकची विकेट मिळवून दिली, मात्र याचवेळी त्याचा पाय दुमडला आणि गुडघ्याला दुखापत झाली. याच पायाच्या दुखापतीतून तो नुकताच सावरला होता, यानंतर शाहिन शाह आफ्रिदी आपले तिसरे षटक टाकण्यासाठी आला, मात्र वेदनांमुळे त्याला गोलंदाजी करणे शक्य झाले नाही. परिणामी एक चेंडू टाकून आफ्रिदीला सामन्यातून बाहेर पडावे लागले. मोहम्मद इफ्तिकारने त्याचे षटक पूर्ण केले. ज्यात इंग्लंडच्या बेन स्टोक्सने एक चौकार आणि एक षटकार लगावला. हेच सामन्यातील निर्णायक षटक ठरले आणि सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला. (T20 World Cup 2022)
2007 : भारत
2009 : पाकिस्तान
2010 : इंग्लंड
2012 : वेस्ट इंडिज
2014 : श्रीलंका
2016 : वेस्ट इंडिज
2021 : ऑस्ट्रेलिया
2022 : इंग्लंड