पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यासाठी आज टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरोधात मैदानात उतरली. सराव सामना असला तरी आम्ही जिंकण्यासाठीच मैदानात उतरलो आहोत, हे भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीने दाखवून दिले.
( Warm-up Match ) अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मी आणि विराट कोहलीने अखेरच्या षटकात अप्रतिम क्रिकेटचे प्रदर्शन घडवले आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचे सर्वच संघांसमाेर मोठे आव्हान असल्याचे दाखवून दिले.
ऑस्ट्रेलियात रविवारपासून ( दि. १६ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ सराव सामन्यासाठी सज्ज होताच. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले.
ऑस्ट्रेलियाने १८ व्या षटकांपर्यंत ४ गडी गमावत १७१ धावा केल्या होत्या. दोन षटकांमध्ये विजयासाठी केवळ १५ धावा हव्या होत्या. सामना हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकल्याचे मानले जात होते. १८ व्या षटकासाठी कर्णधार रोहित शर्माने चेंडू हर्षल पटेलकडे सोपवला. या षटकात हर्षलने ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले. १९ षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावत १७६ धावापर्यंत मजल मारली.
अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ धावांची गरज होती. शम्मी गोलंदाजीसाठी आला. पहिल्या दोन चेंडूत त्याने चार धावा दिल्या. यानंतर तिसर्या चेंडूवर कमिन्स याने उंच फटका लगावला. यावेळी सीमारेषेवर असलेल्या विराटने अप्रतिम झेल पकडत कमिन्सला तंबूत धाडले. चोथ्या चेंडूवर आगर धावचीत झाला. यानंतर शम्मीने सलग दोन चेंडूवर जोश इंगलिस आणि के रिचर्डसन यांना क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.