ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकाला (T-20 World Cup) अधिकृत सुरुवात जरी गेल्या रविवारी झाली असली तरी अजून त्याची हवा तयार झाली नव्हती. हा आठवडा पात्रता फेरीचा होता आणि आठ संघांनी सुपर-12 गाठायला आपले सर्वस्व ओतले. सुरुवातीला वाटले होते की दोन वेळेचे विश्वविजेते वेस्ट इंडिज आणि एक वेळेचे विजेते श्रीलंका यांना निव्वळ रँकिंगच्या फटक्याने पात्रता फेरी खेळायला लावणे लाजिरवाणे आहे, पण या आठवड्यात कळून चुकले की क्रिकेट आणि त्यातून वीस षटकांच्या खेळात कुठलीच गोष्ट गृहीत धरू नये.
श्रीलंकेने नामिबिया विरुद्ध पहिलाच सामना हरून या पात्रता फेरीला खळबळजनक सुरुवात झाली, पण पुढे सावरत श्रीलंका सुपर-12 साठी पात्र झाला. गुरुवारी अटीतटीच्या सामन्यात यूएईने नामिबियाला हरवत नेदरलँडचा मार्ग मोकळा करून दिला. 'ब' गटात जास्त खळबळ माजली. आयर्लंडने चक्क वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेर केले. झिम्बाब्वेने स्कॉटलंडचा पराभव करून पहिल्यांदाच मुख्य फेरीसाठी ते पात्र झाले आणि मुख्य स्पर्धेचे वेळापत्रक अखेर ठरले.
या सर्व आठवड्यातील घडामोडीनंतर भारताचे सामने आता निश्चित झाले आहेत. सुरुवात उद्या (रविवारी) पाकिस्तानशी आहे. पाकिस्ताननंतर आपला पेपर तसा सोपा असेल, कारण हा सामना नेदरलँडशी 27 तारखेला होईल. 30 तारखेला द. आफ्रिका, 2 नोव्हेंबरला बांगला देश आणि शेवटचा साखळी सामना हा 6 नोव्हेंबरला झिम्बाब्वेशी होईल. उपांत्य फेरी गाठायला खात्रीलायक मार्ग हा भारताला 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकून असेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
जर हा हाय व्होल्टेज सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक गुण मिळेल. नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध भारताला जिंकायला फारशी अडचण येऊ नये. बांगला देश त्यांच्या दोन सराव सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून हरला आहे, तर दुसरा सराव सामना पावसाने वाहून गेला. भारताची तयारी आणि संघाचे बलाबल बघता बांगला देशवर मात करणे शक्य आहे. म्हणजेच भारताच्या उपांत्य फेरीचा दरवाजा हा पाकिस्तान किंवा द. आफ्रिका यांच्याविरुद्धच्या विजयाने उघडेल.
अर्थात, क्रिकेटमध्ये जर-तरला अर्थ असता तर आज वेस्ट इंडिज पात्र झालेले दिसले असते. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया, टास्मानिया आणि न्यू साऊथ वेल्स या प्रांतांना गेल्या सात दिवसांत पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. ऑक्टोबरच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस एका दिवसात पडला आहे. विश्वचषकाच्या (T-20 World Cup) उपांत्य फेरीसाठी 12 संघ झुंजतीलच, पण वरुणराजाच्या रूपाने 13 वा संघ गुणतक्त्यात खळबळ माजवू शकतो.
निमिष पाटगावकर