फार पूर्वी म्हणजे अगदी सत्तरच्या दशकामध्ये देशातील निरक्षर लोकांची संख्या फार मोठी होती. निरक्षर म्हणजे ज्यांना कुठलेही लिखाण वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, असे घोर निरक्षर लोक फार मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काही सूचना द्यायची असेल, तर चिन्ह काढावे लागत असे. उदाहरणार्थ, स्वच्छतागृहे. स्त्रियांच्या स्वच्छतागृहावर पत्त्यामधील बदाम किंवा इस्पिक राणी आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहावर सहसा इस्पिक राजाचे चित्र असायचे. ही चित्रे पाहून ग्रामीण आणि शहरी भागातील निरक्षर लोक योग्य त्या ठिकाणी जात असत. आजही पंचतारांकित हॉटेलला गेलात, तर अशा ठिकाणी झगा आणि शर्ट दाखवणारे चित्र बाहेर लावलेले असते. मतपत्रिकेवर मतदान करताना निरक्षर लोकांना कळणार नाही म्हणून चित्रांचा वापर सुरू झाला.
कितीतरी वर्षे काँग्रेसचे मतदान चिन्ह गाय आणि वासरू होते. गाय आणि वासरू ही सहसा भारतीय माणसांना फार पटकन आकर्षित करणारी आणि भुरळ पाडणारी संकल्पना आहे. दिसले गाय- वासरू की, मार शिक्का अशा पद्धतीने वर्षानुवर्षे मतदान चालत राहिले. पुढे काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली आणि काँग्रेसला नवे चिन्ह घ्यावे लागले ते म्हणजे 'हाताचा पंजा.' त्याचबरोबर भाजपने 'कमळ' हे चिन्ह घेतले. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी दहा वाजून दहा मिनिटे वाजलेले दाखवणारे घड्याळ आपले चिन्ह म्हणून घेतले. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे होते. धनुष्यबाण दिसताच प्रभू श्रीरामांची आठवण व्हावी हे भारतीय संस्कृतीमध्ये मोठा झालेल्या प्रत्येकाला माहित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दहा-बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने चिन्ह म्हणून रेल्वेचे इंजिन घेतले.
प्रत्येक पक्षाचा एक पारंपरिक मतदार असतो, तो पिढ्यान् पिढ्या त्या पक्षाला मतदान करत असतो. आजही मतदान यंत्रांवर निवडणुका घेतल्या जात असल्या, तरी आपल्याला जे बटन दाबायचे आहे त्याचे नाव शोधावे लागते आणि त्या नावापुढे त्याचे चिन्ह लावलेले असते. तुम्हाला वाचता येत असो किंवा नसो, तुम्हाला मतदान करणे अत्यंत सोपे आहे. मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा, यादीमधील आपल्या नावापुढे अधिकारी लोक आल्याची नोंद करतात. मतदान यंत्राजवळ जायचे आणि आपल्या आवडत्या उमेदवाराचे नाव वाचून किंवा वाचता येत नसेल, तर त्याचे चिन्ह पाहून मतदान करायचे, ही साधी, सोपी प्रक्रिया आहे.
आजच्या गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अनेक तगडे अपक्षसुद्धा मैदानामध्ये उतरणार आहेत. अपक्षांना सहसा कपबशी, टीव्ही, पंखा, मिक्सर, नळाची तोटी, आकाश कंदील, क्रिकेटची बॅट किंवा काहीही चिन्ह म्हणून मिळू शकते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणि चिन्ह मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत आजकाल जेमतेम 35 दिवसांचा कालावधी असतो. अपक्ष निवडून येणार्या उमेदवारांचे आम्हाला विशेष कौतुक वाटते. कारण, त्यांचे विशिष्ट असे कोणतेही चिन्ह नसते आणि अवघ्या 35 दिवसांच्या कालावधीत ते आपले चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवतात. आपण निवडून येणे कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून सांगतात आणि निवडून येतात. हा खरे तर चमत्कारच म्हटला पाहिजे.