Latest

माउंट एव्हरेस्टवर नववारीत फडकवला तिरंगा! गिर्याराेहक सुविधा कडलग यांची यशस्वी चढाई

अमृता चौगुले

मोहसीन शेख

बाणेर (पुणे) : पुण्यातील बाणेर येथील गिर्याराेहक सुविधा कडलग यांनी अथक परिश्रमाने अतिउच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. तब्बल ८ हजार ८४९ मीटर उंचीचे हे शिखर सर करीत दोन मुलांची आई असणाऱ्या सुविधा यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. या मोहिमेतून त्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. शिखर सर केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी नववारी साडी नेसून हाती भगवा झेंडा व तिरंगा उंचावत जल्लोष केला.

पुणे ते दिल्लीमार्गे काठमांडू ते रामशाप असा प्रवास करून सुविधा यांनी गेल्या ८ एप्रिल रोजी या मोहिमेस सुरुवात केली. १७ मे रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. 'दी अल्पायनिस्ट' या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सुविधा कडलग, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे हे सहभागी झाले. या गिर्यारोहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि अचानक बदललेल्या प्रतिकूल वातावरणामध्येही सुविधा यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी माउंट एव्हरेस्टवर नववारी साडी परिधान करून हातात भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. तसेच भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊ त्यांनी या अतिउच्च शिखरावर जल्लोष केला.

उणे २० अंश सेल्सिअस तापमान

सुविधा कडलग म्हणाल्या की, उणे २० अंश सेल्सिअस तापमानात प्रचंड थंडी, रात्रीच्या प्रहरी चढाई, अशा कठीण परिस्थितीत सकारात्मक विचारांची साथ हे शिखर सर करण्यासाठी अधिक बळकटी देणारी ठरली. शिखर सर केल्यानंतर मोहिमेवरून परतताना पाय घसरला. मात्र, मी सुदैवाने वाचले. एव्हरेस्ट शिखराची यशस्वी मोहीम आयुष्यभर ऊर्जा देणारी आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शिखर गाठण्याची मनात जिद्द ठेवली. या प्रवासात कुटुंबासह हितचिंतकांचे मिळालेले पाठबळ ऊर्जा देणारे होते. कित्येक दिवसांपासून मनात जोपासलेल्या ध्येयाच्या दिशेने या मोहिमेत पडणारे प्रत्येक पाऊल निश्चितच मनाला आनंद देणारे होते.

– सुविधा कडलग, गिर्याराेहक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT