Latest

Suryakumar Yadav : सूर्याला ‘ICC क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली. या पुरस्कारासाठी एकूण चार खेळाडूंना नामांकन दिले आहे. यात टीम इंडियाचा मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नावाचा समावेश करण्यात आला आहे. पुरस्काराच्या या शर्यतीत सूर्यासमोर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, इंग्लंडचा सॅम कुरेन आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान यांचे आव्हान असेल.

या वर्षी सूर्याच्या बॅटमधून एकूण 68 षटकार

सूर्यकुमार यादवसाठी (suryakumar yadav) हे वर्ष चांगले गेले. सूर्याच्या बॅटने यावर्षी 31 सामन्यांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. तसेच 2022 मध्ये त्याच्या बॅटमधून एकूण 68 षटकार आले आणि तो या यादीत इतर खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे.

या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत सूर्याने (suryakumar yadav) एकापेक्षा एक वादळी खेळींचे प्रदर्शन केले. त्याने 6 सामन्यात 60 च्या सरासरीने आणि 189.9 च्या सर्वोच्च स्ट्राइक रेटने 239 धावा वसूल केल्या. त्याचबरोबर विश्वचषकात सर्वाधिक धावा फटकावणा-या फलंदाजांच्या यादीतही तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विराट कोहली 296 धावा करत अव्वल स्थानावर होता. सूर्याने या स्पर्धेत 3 अर्धशतके झळकावली.

सॅम कुरेनने गाजवला टी-20 विश्वचषक

इंग्लिश अष्टपैलू सॅम कुरेन यंदाच्या आयपीएल मिनी लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने 18.5 कोटी मोजून सॅम कुरेनला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. कुरेनने 2022 च्या टी 20 विश्वचषकात 67 धावा केल्या. तसेच 13 विकेट्स मिळवल्या. स्पर्धेतील अव्वल बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 2022 मध्ये 19 सामन्यांत 25 विकेट घेतल्या.

सिकंदर रझाची अष्टपैलू खेळी…

झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिंकदर रझाने यावर्षी 24 टी-20 सामन्यांमध्ये 735 धावा केल्या, तर 25 विकेट पटकावल्या. त्याचबरोबर विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 25 धावांत 3 बळी घेऊन स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर केला होता. विश्वचषकातील 8 सामन्यांत त्याने 147.97 च्या स्ट्राईक रेटने 219 धावा केल्या. आयपीएलच्या मिनी लिलावात त्याला पंजाब किंग्जने चांगली किंमत देऊन विकत घेतले.

मोहम्मद रिझवानची सलग दुस-या वर्षी चकमकदार कामगिरी

पाकिस्तानच्या यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने यावर्षी 25 टी-20 सामन्यांमध्ये 996 धावा फटकावल्या आहेत. तसेच यष्टीमागे 9 फलंदाजांचे झेल टिपले असून 3 खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. त्याने यावर्षी 10 अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर टी-20 वर्ल्ड कपमध्ये 175 धावा केल्या. त्याने गतवर्षी विक्रमी 1326 धावा आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT