नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील राजीव गांधी नगरमधील वसाहतीत वास्तव्य करीत असलेल्या चंडालीया कुटुंबातील सुरेंद्र हा देशसेवेसाठी सज्ज झाला आहे. संगणक शाखेची पदवी मिळवून सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झाला आहे. आता तो आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी आई वडिलांचे तसेच आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे.
कष्टकर्यांची वसाहत म्हटले की अरुंद गल्ल्या, कच्ची बांधकामे असलेल्या राजीव गांधीनगर वसाहतीत राहणारा एक कष्टकर्याचा तरुण मुलगा सीमा संरक्षण दलाची (बीएसएफ) भरती प्रक्रिया उत्तीर्ण झाला. आता तो आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज होत आहे.
सुरेंद्र बलजीत चंडालिया हा या वसाहतीतील संगणक शाखेचा पदवीधर आहे. पंखा व एसीखाली बसून मिळणार्या पगाराला नाकारत दिवस, रात्र, ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता देश संरक्षणाच्या शालीचे वेड पांघरून सीमेवर संरक्षणासाठी निघणार आहे.
सुरेंद्र हा मूळचा हरीयाणाचा जरी असला तरी त्याच्या जन्मापासून त्याचे कुटुंब पिंपळे गुरव परिसरात स्थायिक झाले आहे. त्याचे वडील बलजीत हे एका खासगी सोसायटीमध्ये तुटपुंज्या पगारावर स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. तर आई पूर्वी धुणी भांड्याची कामे करत होती. त्यामुळे कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या आणि जेथे राहतो, त्या राजीव गांधी वसाहतीमध्ये शैक्षणिक वातावरण नसतानाही सुरेंद्रने संगणकाची पदवी संपादन केली. आता देशसेवेसाठी घेत असलेले त्याचे व्रत पाहता तो आजच्या युवक युवतींसाठी रोल मॉडेल ठरणार आहे.
दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेतून सुरेंद्रने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. 83 टक्के गुण प्राप्त करून त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यानंतर बाबूरावजी घोलप महाविद्यालयात संगणक पदवी (बीसीएस) त्याने द्वितीय श्रेणीत पूर्ण केली. आरपीआय मातंग आघाडीचे अश्विन खुडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे, रमेश गजरमल, विलास थोरात, सचिन देडे, सतीश झोंबाडे, आकाश हावळे, विकास खंदारे, विकास शेरे यांनी सुरेंद्रच्या यशाबद्दल त्याचा घरी जाऊन सत्कार केला. संगणक पदवीधर असतानाही पिंपळे गुरव येथील सुरेंद्र चंडालिया या युवकाने सीमा सुरक्षा दलाचा रस्ता धरला, त्याबद्दल त्याचा स्थानिकांनी सत्कार केला.
15 ऑगस्ट, 26 जानेवारीला सोशल मीडियावर स्टेटस ठेवून देशसेवा घडत नसते. पहिल्यापासूनच मला आव्हानात्मक जीवन जगण्याचा ध्यास होता. संगणक पदवीधर असलो म्हणून काय झालं, बीएसएफमध्ये पण मला पगार मिळणार आहे. अंतर्गत परीक्षा देऊन तेथेही मला बढती मिळणार आहे.
-सुरेंद्र चंडालिया
हेही वाचा