शेळगाव, पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुई या ठिकाणी स्व. आत्माराम पाटील यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी केवळ 35 विद्यार्थ्यांवर श्री बाबीर विद्यालयाची सुरुवात केली. आज त्याचा वारसा त्यांचे मुले अमरसिंह पाटील, अजितसिंह पाटील, उदयसिंह पाटील आदींसह कुटुंबातील अन्य सदस्यांनी सुरू ठेवला आहे. गोरगरिबांची जवळपास 700 विद्यार्थी येथे उत्तम शिक्षण घेत असून, पाटील कुटुंबाचे शिक्षण क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे, अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
रुई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीर विद्यालयास खासदार शरद पवार यांच्या निधीतून 3 वर्गखोल्या व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या निधीतून देण्यात आलेल्या वर्गखोल्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्या वेळी खासदार सुळे या बोलत होत्या. या वेळी सोनाईचे प्रमुख दशरथ माने यांनी सांगितले, की या तालुक्यात कोणी पण येऊ द्या, सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी होणार नाही. तसेच श्री बाबीर विद्यालयाच्या वर्गखोल्यासाठी 10 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांनी श्री बाबीर विद्यालयाचे कौतुक केले. मीरा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, अमोल भिसे, महिला अध्यक्ष छाया पडसळकर, विद्यालयाचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, अजितसिंह पाटील, उदयसिंह पाटील आदींसह ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, शिक्षकवर्ग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील यांनी केले.